नुकसानाच्या अंतीम अहवालास लागणार विलंब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 02:51 PM2019-11-11T14:51:33+5:302019-11-11T14:51:53+5:30
नुकसानाचे अंतीम अहवाल तयार करून ते विभागीय आयुक्त व पिकविमा कंपन्यांकडे पाठविण्यास विलंब लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अवकाळी पावसामुळे झालेल्या पिक नुकसानाच्या लिखीत पंचनाम्यांमध्ये बऱ्याच त्रुटी असून त्या पूर्ण करताना तहसील व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. यामुळेच तुलनेने अधिक प्रमाणात असलेल्या नुकसानाचे अंतीम अहवाल तयार करून ते विभागीय आयुक्त व पिकविमा कंपन्यांकडे पाठविण्यास विलंब लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात २७ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सुमारे १ लाख ७४ हजार ३५७ शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यात वाशिम तालुक्यातील ३१ हजार ५६२, रिसोड ३४ हजार २८७, मालेगाव ३० हजार १६९, मंगरुळपीर २९ हजार २७४, मानोरा १६ हजार ८४९ आणि कारंजा तालुक्यातील ३२ हजार २१६ शेतकºयांचा समावेश आहे. झालेल्या पिकांच्या नुकसानाचे तलाठ्यांनी पंचनामे करून ते तहसील व तालुका कृषी अधिकारी कार्यालयांकडे ८ नोव्हेंबर या अंतीम मुदतीपर्यंत सादर केले आहेत. दरम्यान, ज्या शेतकºयांनी खरीप हंगामात पिकविमा काढलेला नाही, परंतु त्यांच्या पिकांचे नुकसान झाले, असे शेतकरी व पिकविमाधारक शेतकºयांच्या नुकसानाच्या या पंचनाम्यांची ९ नोव्हेंबरपासून प्रशासकीय पातळीवर तथा युद्धस्तरावर पडताळणी करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील सहाही तहसील कार्यालये आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयांमध्ये पुरेशा प्रमाणात संगणक, कंत्राटी तत्वावरील संगणक परिचालकांची सोय उपलब्ध करण्यासह कर्मचाºयांच्या सुट्या रद्द करून तथा तलाठी, ग्रामसेवकांना बोलावून अचूक पंचनाम्यांची ‘डाटा एन्ट्री’ करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू असल्याचे रविवारी देखील दिसून आले. प्रत्यक्षात मात्र नुकसानाचे आणि पंचनाम्यांचे प्रमाण कितीतरी पटीने अधिक असल्याने अंतीम अहवाल तयार करून ते विभागीय आयुक्त आणि पिकविमा कंपन्यांकडे पाठविण्यास बराच विलंब लागणार आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत मिळण्यासही प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे एकंदरित चित्र निर्माण झाले आहे.
जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्यांची कामे ८ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, हे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. काही गावांमधील थोड्याफार प्रमाणातील पंचनामे अद्याप बाकी असून ते देखील सोमवारपर्यंत पूर्ण होतील. दरम्यान, लिखीत स्वरूपातील नुकसानाच्या पंचनाम्यांची आता ‘डाटा एन्ट्री’ केली जात असून त्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. तहसील कार्यालये, तालुका कृषी अधिकारी कार्यालयासोबतच जिल्हाधिकारी कार्यालयातही हे काम सुरू आहे. ‘डाटा एन्ट्री आॅपरेटर’ आणि पुरेशा प्रमाणात संगणकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- ऋषीकेश मोडक, जिल्हाधिकारी, वाशिम