बँकेच्या कामात विलंब, व्यवस्थापकास पेढे देऊन गांधीगिरी आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:44 AM2021-07-28T04:44:17+5:302021-07-28T04:44:17+5:30
मानोरा येथील स्टेट बँकेच्या ढिसाळ कामकाजामुळे नोकरदार, शेतकऱ्यांसह सर्वच त्रस्त आहेत. बँकेत साधा विड्रॉलसुद्धा करायचा असला तरी किमान एक ...
मानोरा येथील स्टेट बँकेच्या ढिसाळ कामकाजामुळे नोकरदार, शेतकऱ्यांसह सर्वच त्रस्त आहेत. बँकेत साधा विड्रॉलसुद्धा करायचा असला तरी किमान एक दिवस द्यावा लागतो, तर कधी मागील सप्ताहात चक्क बँकच बंद होती. ग्रा.पं.चे पंधराव्या वित्त आयोगाचे खाते बँकेच्या असहकार्याला कंटाळून तालुक्याबाहेर कारंजा येथील बँकेत उघडण्यात आले, तर काही जणांनी तालुक्यातील फुलउमरी येथे जाऊन खाते उघडले. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांनी ऋणसमाधान योजनेंतर्गत वन टाइम सेटलमेंट पैशाचा भरणा करूनसुद्धा अद्यापपावेतो पीक कर्ज मिळाले नाही. शिवाय खातेदारांना आपल्या खात्याचे स्टेटमेंट व बँक पासबुकवर नोंदीसुद्धा मिळत नाहीत, अशाच कामकाजामुळे सर्व त्रस्त आहेत. ग्रामसेवक अनिल सूर्य यांनी ग्रामपंचायतीच्या खात्यावरील चेक मिळण्यासाठी एप्रिलमध्ये अर्ज केला होता, त्यांना चक्क २६ जुलै ला बँकेचा चेक मिळाला. तोपर्यंत बँकेचे उंबरठे झिजवले ते वेगळेच. तीन महिन्यांनंतर चेक मिळाल्याने ग्रामसेवक सूर्य यांनी सरळ बँकेत जाऊन नव्याने रुजू झालेले शाखा व्यवस्थापक पंकज शरणागत यांना पेढे देऊन गांधीगिरी केली, तसेच गेल्या चार महिन्यांपासून पंचायत समितीमधून कास्तकाराला मिळणारे अनुदान चार महिन्यांच्या आधी भारतीय स्टेट बँकेत जमा केले; पण स्टेट बँकेने आतापर्यंत कास्तकाराच्या खात्यामध्ये अनुदान रक्कम जमा केली नाही. त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, तुमचे पैसे जमा होणार असल्याचे सांगितले.
......
ग्रा.पं.च्या कामकाजासाठी नॅशनल बँकेत खाते असणे आवश्यक आहे; परंतु शहरात फक्त एकमेव नॅशनल बँक असल्यामुळे कोणतेही काम वेळेवर होत नाही, कामे वेळेवर व्हावीत यासाठी गांधीगिरी केली.-
अनिल सूर्य, ग्रामसेवक
....
मी गत दोन दिवसांपूर्वीच रुजू झालो आहे. मनुष्यबळ कमी असल्यामुळे अनेक कामे खोळंबली आहेत. केवळ दोनच कर्मचारी असल्यामुळे सर्वच कामे होणे शक्य नाही. बँकेचे कामकाज सुरळीत करण्याचा माझा प्रयत्न राहीन.
-पंकज शरणागत,
शाखा व्यवस्थापक स्टेट बँक, मानोरा