‘टेस्टिंग रिपोर्ट’अभावी शेतकऱ्यांना कृषी रोहित्र मिळण्यास विलंब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 02:40 PM2020-02-16T14:40:01+5:302020-02-16T14:40:08+5:30
‘टेस्टिंग रिपोर्ट’ लवकर मिळत नसल्याने विज जोडणी मिळण्यास विलंब होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.
- सुनील काकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शेतीला सिंचनासाठी आवश्यक असलेला वीज पुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्हयातील शेतकऱ्यांनी रोहित्रांची मागणी केली आहे; मात्र लाखो रुपये भरुनही केवळ ‘टेस्टिंग रिपोर्ट’ लवकर मिळत नसल्याने विज जोडणी मिळण्यास विलंब होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. सद्या सुरु असलेल्या रब्बीतील पिकांवर त्याचा परिणाम होत आहे.
जिल्ह्यात ४ हजार ४४५ कृषीपंपांना विजजोडणी देण्याचे उद्दीष्ट आहे. त्यापैकी १५ फेब्रूवारी २०२० अखेर २ हजार २४१ कृषीपंपांना विजजोडणी देण्यात आली असून २ हजार १४१ कृषीपंपांना विजजोडणीचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमधून सिंचनासाठी पाणी घेऊ इच्छित काही शेतकºयांना विजेची गरज भासत आहे. त्यासाठी त्यांनी रितसर अर्ज करून तथा आवश्यक असलेली लाखो रुपयांची रक्कम अदा करूनही केवळ ‘टेस्टिंग रिपोर्ट’ मिळण्यास विलंब होत असल्याने रोहित्र कार्यान्वित होणे अशक्य झाले आहे. यासंदर्भात माहिती जाणून घेतली असता, ठेकेदारांकडून रोहित्र बसविल्यानंतर त्याची विद्यूत निरीक्षकांकडून तपासणी केली जाते. त्यात रोहित्र किती क्षमतेचे आहे, त्याच क्षमतेचे फेज लावण्यात आले आहे का, प्रत्येक विद्यूत खांबावर नियमानुसार आर्थिंग तार बसविली आहे का, आदींचा समावेश आहे. या निरीक्षणानंतरच रोहित्रांचा ‘टेस्टिंग रिपोर्ट’ देऊन रोहित्रांना विद्यूत जोडणीस परवानगी दिली जाते. हा रिपोर्ट मिळण्यास मात्र बराच विलंब लागत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.
महिनाभरापूर्वी २.६० लाख रुपये भरूनही मिळाले नाही रोहीत्र
शिरपूरपासून जवळच मिर्झापूर सिंचन प्रकल्प असून मुबलक प्रमाणात पाणीसाठा असतानाही केवळ विजेअभावी शेतकºयांना सिंचनाचा लाभ मिळेनासा झाला आहे. दरम्यान, शिरपूर येथील शेतकरी गोपाल देशमुख, दिलीप बाविस्कर, हसन गवळी, सुरेश डुकरे, कैलास बाविस्कर व विठ्ठल काळे यांनी दोन महिन्यांपूर्वी रोहित्रासाठी दीड लाख व विद्यूत खांबांसाठी लागणारे १.१० लाख असे एकूण २.६० लाख रुपये भरूनही केवळ ‘टेस्टिंग रिपोर्ट’ न मिळाल्याने रोहित्र मिळू शकले नाही.
मिर्झापूर सिंचन प्रकल्पामध्ये मुबलक प्रमाणात जलसाठा असतानाही सिंचनासाठी पाणी मिळणे अशक्य झाले आहे. रोहित्र बसवून मिळावे, यासाठी महावितरणकडे आम्ही सहा शेतकºयांनी महिनाभरापूर्वी २.६० लाखांचा भरणा केला; मात्र ’टेस्टिंग रिपोर्ट’ मिळाला नसल्याने रोहित्र बसवू शकत नाही, असे ठेकेदाराचे म्हणणे आहे. यामुळे सिंचनाचा प्रश्न भेडसावत असून नुकसान होत आहे.
- विठ्ठलराव काळे
शेतकरी, शिरपूरजैन
जिल्ह्यातील विद्यूत रोहित्र बसविण्याचे काम करणाºया ठेकेदारांनी विद्यूत वाहिनी आणि खांब उभारल्यानंतर रोहित्र स्थापित करण्यापूर्वी त्यात कुठल्याही अडचणी नसल्याबाबत सखोल चौकशी व तपासणी करावी लागते. या प्रक्रियेत प्रशासनाकडून कुठलीही हयगय केली जात नाही. सद्य:स्थितीत अशी केवळ ६० प्रकरणे प्रलंबित असून ती देखील लवकरच निकाली काढण्यात येतील.
- सारंग नाई
विद्यूत निरीक्षक, महावितरण, वाशिम