प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचवा - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 11:45 AM2020-08-17T11:45:24+5:302020-08-17T11:46:00+5:30
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या आढावा सभेत त्या बोलत होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आॅनलाईन शिक्षणासंदर्भात कोणतीही सुविधा उपलब्ध नसणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेवून जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचवावे, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागाला १५ आॅगस्ट रोजी केल्या. जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या आढावा सभेत त्या बोलत होत्या.
यावेळी लोकप्रतिनिधींसह शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देवून विद्यार्थ्यांना विविध ई-संवादाच्या माध्यमांद्वारे शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता विविध माध्यमे वापरली जात आहेत. मात्र, ज्या विद्यार्थ्यांकडे यापैकी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही, अशा विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेवून जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचविण्याच्या दृष्टिने कार्यवाही करावी, अशा सूचना ना. गायकवाड यांनी दिल्या. ‘कोरोना’ परिस्थितीमुळे शाळा सुरु करणे शक्य होणार नाही. त्याचप्रमाणे त्यांचे शैक्षणिक वर्ष सुद्धा वाया जाता कामा नये, यासाठी आॅनलाईन शिक्षणास परवानगी देण्यात आली आहे, असे सांगून ना. गायकवाड यांनी शिक्षण विभागातील रिक्त पदे, मोफत पाठ्यपुस्तक वितरण, आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया आदी विषयांचाही आढावा घेतला.