पळवून आणलेल्या चिमुकलीची सुटका
By admin | Published: December 30, 2014 12:53 AM2014-12-30T00:53:24+5:302014-12-30T00:53:24+5:30
रेल्वे सुरक्षा बलाच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ ; बुलडाणा येथील बाल सुधार गृहात रवानगी.
मलकापूर (बुलडाणा ) : रेल्वे सुरक्षा बलाच्या सतर्कतेमुळे पुण्यावरून अज्ञात इसमांनी पळवून आणलेल्या आठ वर्षीय चिमुकलीची सुटका झाल्याची घटना आज २९ डिसेंबर रोजी दुपारी घडली. सदर मुलीची रवानगी जिल्हा बाल सुधार विभाग बुलडाणा येथे करण्यात आल्याचे रेसुबच्या सूत्रांनी सांगितले.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, दुपारी १ वाजेच्या सुमारास रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयात रेल्वे लाईनवरील खंबा नं.४९१/१0 जवळ एक मुलगी (वय ८) रडत असल्याची माहिती मिळाली. यावर रेसुबचे उपनिरीक्षक पी.के. गुज्जर यांच्या आदेशावरून आरक्षक दिलीप महाजन व रंजन तेलंग यांनी घटनास्थळ गाठले. सदर मुलीची चौकशी केली असता तिने सांगितले की झोपेत असताना रमेश नावाच्या इसमाने तिला पुण्यावरून मलकापूरला आणले. तुझी आई इथे आहे असे तिला सांगण्यात आले; मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही. त्या मुलीने कशीबशी सुटका करून आईच्या शोधात ती रेल्वे लाईनने खामखेडकडे रडत निघाली होती.
रेसुबच्या पोलिसांनी तिला जेवन देऊन जीआरपीचे आरक्षक बबन शिंदे यांच्या ताब्यात दिले. शहर पोलीस ठाण्यातील महिला शिपाई समवेत त्यांनी सदर मुलीस बुलडाणा येथील जिल्हा बाल सुधार विभागाकडे सुपूर्द केल्याची माहिती रेसुबचे अधीक्षक रंजन तेलंग यांनी दिली आहे.