शाळेत भिजलेला पोषण आहार पोहोचविला; सभापतींच्या हस्तक्षेपाने माल परत पाठविला, देपूळच्या शाळेतील घटना
By संतोष वानखडे | Published: November 28, 2023 06:33 PM2023-11-28T18:33:01+5:302023-11-28T18:33:13+5:30
सभापती वानखेडे यांच्या हस्तक्षेपामुळे निकृष्ट माल परत झाला.
वाशिम : वाशिम तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा देपूळ येथे २८ नोव्हेंबर रोजी निकृष्ट व भिजलेला पोषण आहार पाठविण्यात आल्याने, हा आहार न स्विकारण्याचा आक्रमक पवित्रा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गंगावणे यांनी घेतला. परंतु संबंधित ठेकेदाराचे प्रतिनिधी हा माल परत नेण्यास तयार नव्हते. शेवटी वाशिम पंचायत समितीच्या सभापती सावित्रीबाई वानखेडे यांनी हस्तक्षेप केल्याने हा पोषण आहार अखेरीस परत नेण्यात आला. २८ नोव्हेंबर रोजी शालेय पोषण आहार घेऊन आहार पूरवठा करणार्या ठेकेदाराचे प्रतिनिधी देपूळच्या जिल्हा परिषद शाळेत पोहोचले. चना ५५ किलो, मूंग दाळ ३५ किलो, तांदूळ ७ क्विंटल ५० किलो, वाटाणा चटणी हळद मसूरदाळ असा माल शाळेत उतरविला.
परंतु हा माल पाण्याने भिजून ओला झाला व खराब होऊन निकृष्ट झाल्याने तो परत घेऊन जा व चांगला माल द्या अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप गंगावणे यांनी केली; परंतु संबंधित ठेकेदाराचे प्रतिनिधी ऐकायला तयार नव्हते. यावर संदीप गंगावणे यांनी वाशिम पं स सभापती सावित्रीबाई वानखेडे यांच्याशी संपर्क साधला. त्यावर सभापतींनी गंभिर दखल घेऊन शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी गवळी यांना दूरध्वनीवरून हा माल परत घेण्यासाठी उचित कार्यवाही करावी, असे निर्देश दिले. त्यामुळे भिजलेला माल शेवटी कंत्राटदारालाच्या प्रतिनिधींना परत न्यावा लागला. सभापती वानखेडे यांच्या हस्तक्षेपामुळे निकृष्ट माल परत झाला.