तीन दिवसात ४५२ रेमडेसिविर इंजेक्शनचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 06:01 PM2021-05-20T18:01:29+5:302021-05-20T18:01:37+5:30
Remedivir injections : खाजगी कोविड रुग्णालयांना गेल्या तीन दिवसांत ४५२ रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहेत.
वाशिम : जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांसह खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत भर पडत असून जिल्हा प्रशासनाने रुग्णांच्या सोयीसाठी खाजगी कोविड रुग्णालयांना गेल्या तीन दिवसांत ४५२ रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे रुग्णांच्या उपचारातील अडथळा दूर होण्यासह इंजेक्शनसाठी होणारी भटकंती संपुष्टात आली आहे.
जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना १० मे पासून जिल्हा प्रशासनामार्फत रेमडेसिविर इंजेक्शन दैनंदिन वितरण करणे सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण २२ खाजगी कोविड रुग्णालये आहेत. गेल्या ३ दिवसांपासून या सर्व खाजगी रुग्णालयांना जिल्हा प्रशासनाकडून रेमडेसिविर इंजेक्शनचे दैनंदिन वितरण करणे सुरू आहे. यामुळे रुग्णांची सोय होत आहे. गत तीन दिवसांत ४५२ रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहेत.