शेतीच्या नुकसानीसाठी जबाबदार रस्ता कंपनीवर करवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:46 AM2021-07-14T04:46:45+5:302021-07-14T04:46:45+5:30
मानोरा - कारंजा रस्ता काम करणाऱ्या ईगल इंफ्रास्ट्रक्चर कंपनी मुंबईच्या हलगर्जीमुळे शेतात पाणी शिरले व पिकाचे, जमिनीचे मोठे नुकसान ...
मानोरा - कारंजा रस्ता काम करणाऱ्या ईगल इंफ्रास्ट्रक्चर कंपनी मुंबईच्या हलगर्जीमुळे शेतात पाणी शिरले व पिकाचे, जमिनीचे मोठे नुकसान झाले. या कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून देऊन करवाई करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त ९ शेतकऱ्यांनी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी मानोरा यांच्याकडे १२ जुलैरोजी निवेदनाद्वारे केली.
तालुक्यातील धामणी व वाटोद शिवारात असलेल्या शेतीला लागून नाला आहे. हा नाला कारंजा रोडच्यालगत असून १० जुलै रोजी रात्री पाऊस आला, त्यामुळे नाल्याला पूर आला. नाल्यावर पुलाचे काम सुरू आहे. नाला अडविल्याने पाणी शेतात आले. परिणामी पिकाचे व शेतीचे मोठे नुकसान झाले. यामुळे पिके व शेती खरडून गेली, दुबार पेरणी करावी लागणार आहे. या नुकसानीसाठी जबाबदार असणाऱ्या ईगल कंपनी यांच्याकडून नुकसान भरपाई मिळावी, दुबार पेरणीकरिता शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी सूरज विनोद पाटील, रुख्माबाई सदाशिव पाटील, विनोद भिकाजी पाटील, निशांत विनोद पाटील, वैशाली विनोद पाटील, पंकज अशोकराव ठाकरे, प्रमोद विठ्ठल ठाकरे, राजेश्वर ठाकरे, बाला श्यामराव होलगरे यांनी केली आहे.