पाणंद रस्ता मोकळा करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:26 AM2021-06-23T04:26:42+5:302021-06-23T04:26:42+5:30
शेतकऱ्यांना शेतीतील कामे करण्यास रस्त्याच्या अडचणींचा सामना करावा लागतो ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाकडून मोहीम राबवून पाणंद रस्ते मोकळे ...
शेतकऱ्यांना शेतीतील कामे करण्यास रस्त्याच्या अडचणींचा सामना करावा लागतो ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाकडून मोहीम राबवून पाणंद रस्ते मोकळे करण्यात आले, असे असले तरी काही शेतकऱ्यांनी पाणंद रस्ते बंद केल्याने इतर शेतकऱ्यांना शेतात ट्रॅक्टर व इतर साधने नेताना अडचणीचा सामना करावा लागतो. यात अनेक वेळा वाद निर्माण होतात. त्यामुळे शासनाने पाणंद रस्ते मोकळे करून द्यावे, अशी मागणी शेलूबाजार येथील शेतकरी गणेश गायके यांनी तहसीलदाराकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार त्यांची शेलुबाजार येथे वनोजा २ येथील गट नंबर ७५/ ३ मधील १ हेक्टर ७ आर शेतजमीन असून, काही शेतकऱ्यांनी पारंपरिक रस्ता बंद केला आहे. त्यामुळे खरीप हंगामाची पेरणी करण्याकरिता ट्रॅक्टर नेण्यास अडचणी निर्माण होत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सदर पांदण रस्ता मोकळा करुन द्यावा , अशी मागणी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास आपल्याला उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल असा इशारा गणेश गायके यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.