ऑनलाईन परीक्षेसाठी संगणक केंद्रांकडून जादा पैशांची मागणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 01:03 PM2020-10-06T13:03:21+5:302020-10-06T13:04:02+5:30
Washim, Onlie Exam, Student विद्यार्थ्यांना एक हजार रुपयाची मागणी झाल्याची बाब समोर आली.
- बबन देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा: कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठांतर्गत ५ ऑक्टोबर रोजी बी.कॉम भाग तीनचा पेपर झाला असून, मानोरा येथील सक्सेस संगणक केंद्रावर काही विद्यार्थ्यांना एक हजार रुपयाची मागणी झाल्याची बाब समोर आली.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अंतिम वर्षाच्या परीक्षा प्रत्यक्ष न घेता आॅनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहेत. ज्यांच्याकडे मोबाईल किंवा अन्य साधणे उपलब्ध नाहीत, असे विद्यार्थी संगणक केंद्राकडे धाव घेतात. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठांतर्गत ५ आॅक्टोबर रोजी बी.कॉम भाग तीनचा पेपर झाला. हा पेपर देण्यासाठी मानोरा येथील सक्सेस संगणक केंद्रावर काही विद्यार्थी गेले असता, पेपर सोडवून द्यावयाचा असेल तर एक हजार रुपये आणि स्वत:कडे मोबाईल असेल किंवा स्वत: पेपर सोडवायचा असेल तर ७० रुपये द्यावे लागतील, असे संगणक केंद्र संचालकाने सांगितल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. काही विद्यार्थ्यांनी पैसे दिले तर काही विद्यार्थ्यांनी पैसे दिले नाहीत.
विद्यार्थ्यांकडून जादा पैसे घेतले नाहीत. ज्यांच्याकडे कोणतीच सुविधा उपलब्ध नाही, त्यांनी मजूरी व अन्य चार्जेस म्हणून २०० रुपये द्यावे आणि ज्यांच्याकडे मोबाईल आहे, त्यांनी ७० रुपये द्यावे, असे सांगितले. काही गरीब प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून तर कोणतीही रक्कम न घेता त्यांना आॅनलाईन पद्धतीने पेपर सोडविण्याची सुविधा संगणक केंद्रात उपलब्ध करून दिली होती. - नविद शेख
संचालक सक्सेस संगणक केंद्र मानोरा
बी.कॉम अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी सक्सेस संगणक केंद्रात गेलो असता, पेपर सोडवून देण्यासाठी एक हजार रुपयाची मागणी केली होती. मात्र, एवढी रक्कम जवळ नसल्याने तेथून बाहेर पडलो आणि दुसऱ्या संगणक केंद्रातून पेपर सोडविला.
- यश सोळंके, विद्यार्थी