इम्युनिटी वाढविणाऱ्या तुळस, अश्वगंधाच्या रोपांना मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:44 AM2021-05-06T04:44:01+5:302021-05-06T04:44:01+5:30
वाशिम : रोगप्रतिकारक शक्ती वाढवा आणि कोरोना टाळा, असा सल्ला दिला जात असल्याने अनेकजण प्रतिकारक शक्ती वाढविण्यावर भर देत ...
वाशिम : रोगप्रतिकारक शक्ती वाढवा आणि कोरोना टाळा, असा सल्ला दिला जात असल्याने अनेकजण प्रतिकारक शक्ती वाढविण्यावर भर देत आहेत. त्यासाठी आयुर्वेदामध्ये महत्त्व सांगितलेल्या वनस्पतींच्या रोपांची मागणी वाढली आहे. वाशिम जिल्ह्यातही तुळस, अश्वगंधा, गुळवेल यासह वनस्पती औषधींच्या रोपांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
कोरोनाकाळात आरोग्यविषयक जनजागृती वाढली असून औषधी वनस्पतींचे आरोग्याच्या दृष्टीने असलेले फायदेही नागरिकांच्या लक्षात आले आहेत. त्यामुळे फुलझाडांसोबतच औषधी वनस्पतींचीही लागवड करुन त्यांचा नियमित वापर करण्याकडे नागरिकांचा कल वाढला असल्याचे या दोन महिन्यात निदर्शनास येत असल्याचे नर्सरी चालक सांगतात. नागरिकांमध्ये औषधी वनस्पतींविषयी जागृती वाढत असल्याने नर्सली केंद्र चालकांनीही औषधी वनस्पतींचा पुरवठा वाढीवर भर दिला आहे. ऑक्सिजनसाठी तुळस महत्त्वाची असून घराच्या बाल्कनीत, गच्चीत, आवारात तुळस बहरत असल्याचे दिसून येते. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयानेही अनेक वनौषधींपासून तयार केलेल्या काढ्याचा नियमित वापर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानंतर आयुर्वेदिक काढ्याचे सेवन नागरिक करू लागल्याने औषधी वनस्पतींचे महत्त्वही वाढले आहे. गेल्या दोन महिन्यांत नागरिकांनी नर्सरी विक्रेत्यांकडे याविषयी विचारणा करून त्यांच्याकडून तुळस, अश्वगंधाच्या रोपांची मागणी वाढली आहे. विविध रोपवाटिकांमध्ये सध्या फुलझाडांबरोबरच औषधी वनस्पतींना मागणी वाढल्याचे नर्सरी चालकांचे म्हणणे आहे. प्रामुख्याने तुळस, पुदीना, अश्वगंधा, पानवेल, गुळवेल या वनस्पतींच्या रोपांना मागणी आहे. दरम्यान, जिल्ह्यात काही ठिकाणी या वनस्पतींच्या काड्याही आयुर्वेदिक अौषधी उपलब्ध असलेल्या दुकानातून घेण्यात येत आहे.
०००००००००००००
या रोपांना वाढली मागणी
तुळस : तुळशीचा काढा सर्दी-खोकल्यावर रामबाण मानला जातो. तुळशीची काही पाने दुधात टाकून पिण्याने फायदा होतो. तुळशीत मोठ्या प्रमाणात ॲन्टी-बॅक्टेरियल आणि ॲन्टी-इंफ्लिमेंट्री गुण असतात. जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्याचे काम करतात.
अश्वगंधा : अश्वगंधाचे बरेच आरोग्यवर्धक फायदे आहेत. अश्वगंधाच्या सेवनाने पांढरे केस, डोळ्यांची दृष्टी सुधारणे, घशा संबंधित आजार, खोकला, छातीत दुखणे इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो; परंतु प्रत्येक रोगात अश्वगंधाचे सेवन करण्याचा मार्गदेखील वेगळा आहे. आयुर्वेद तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार अश्वगंधाचा वापर करणे गरजेचे आहे.
गुळवेल संवर्धनाला प्राधान्य
जिल्ह्यात वाशिम शहरालगत गुळवेल वनस्पतीच्या संवर्धनाला प्राधान्य देण्यात असून जुन्या जाणकार व्यक्तींकडून परिसरातील कडुनिंबाच्या झाडावर गुळवेल चढविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. कडुनिंबाच्या झाडावरील गुळवेल ही अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले जाते.
००००००००००००
-- कोट --
या दोन महिन्यात फुलझाडांबरोबरच तुळस, अश्वगंधा यांसारख्या औषधी वनस्पतींना मागणी वाढली आहे. अश्वगंधासाठी नागरिकांकडून बुकिंग केले जात आहे. कोरोना संक्रमण काळात औषधी वनस्पतींकडे नागरिकांचा कल वाढला आहे.
- रामकिसन शिंदे, चालक नर्सरी
०००००००००००
कोट बॉक्स
रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पौष्टिक आहार, वनस्पती औषधीला महत्व आहे. कोरोनाकाळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विविध प्रकारची फळे, आहारावर भर दिला जात आहे तसेच वनस्पती औषधीचा वापर केला वाढत असल्याचे दिसून येते.
- डॉ. सुनीता लाहोरे
आहारतज्ज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम
००००००००००००००