नगर परिषदेकडून चौकशी अहवालाची मागणी
By admin | Published: May 25, 2017 01:44 AM2017-05-25T01:44:18+5:302017-05-25T01:44:18+5:30
रस्त्याच्या कडा भरणीत मातीचा वापर : नगराध्यक्ष आक्रमक
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम शहरामध्ये सरू असलेली रस्ता कामे करताना रस्त्याच्या कडा भरण्यासाठी मातीचा वापर केल्या जात असल्याचे वृत्त लोकमतने २४ मे रोजीच्या अंकात प्रकाशित केल्याबरोबर नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी स्वत:हून भ्रमणध्वनी करून या प्रकरणाची माहिती जाणून घेतली, तसेच वाशिम नगर परिषदेचे श्रेणी क चे नगर अभियंता विजय घुगरे यांनी बांधकाम विभागाकडे कामाची पाहणी करून चौकशी अहवाल मागविणार असल्याची माहिती दिली.
लोकमतच्यावतीने २२ मे पासून ‘विकासाचे भिजत घोंगडे’ वृत्त मालिका सुरू करण्यात आली. यामध्ये शहरात सुरु असलेल्या थातूर-मातूर विकास कामांवर प्रकाश टाकण्यात आला.
यासंदर्भात वृत्त प्रकाशित केल्याबरोबर त्या-त्या दिवशी संबंधित अधिकारी यांनी भेट दिली असता, निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे निष्पन्न झाल्याने सदर काम बंद करून व झालेले काम तोडून पुन्हा दुसरे करण्याच्या सूचनासुद्धा संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्यात. तसेच कामांवर अकुशल मजूर कामे करीत असल्याचेही लोकमतने उघडकीस आणले होते.
सदर मजुरांनासुद्धा काढून टाकण्यात आले.
रस्ता काम पूर्ण होण्याआधीच रस्त्याच्या कडा भरताना नाली बांधकामासाठी खोदण्यात आल्यानंतर निघालेल्या मातीचा वापर भरण्यासाठी करण्यात आला.
याचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी संपूर्ण माहिती जाणून भागाची पाहणी नगर परिषद अधिकाऱ्यांना सोबत घेऊन करणार असल्याचे सांगितले. तर नगर अभियंता विजय घुगरे यांनी सदर प्रकाराबाबत बांधकाम विभागाला आपण चौकशी अहवाल मागून निर्णय घेणार असल्याचे सांगितल्याने सदर प्रकरण चांगलेच चिघडले
आहे. शहरातील विकास कामे टिकाऊ, मजबूत व्हावे, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी यावेळी सांगितले.