तीर्थक्षेत्र शिरपूर जैनसाठी हवी रेल्वेसुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 03:06 PM2019-07-02T15:06:04+5:302019-07-02T15:06:08+5:30
शिरपूर जैन तीर्थक्षेत्रात येणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे सुविधा हवी, अशी मागणी मालेगाव-रिसोडचे आमदार अमित झनक यांनी विधानसभेच्यास अधिवेशनात पुरवणी मागणीत केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम) : जैनांची काशी म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या शिरपूर जैन तीर्थक्षेत्रात येणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे सुविधा हवी, अशी मागणी मालेगाव-रिसोडचे आमदार अमित झनक यांनी विधानसभेच्यास अधिवेशनात पुरवणी मागणीत केली आहे. ही सुविधा उपलब्ध करण्यासाठी शिरपूर जैनला वाशिम रेल्वे रेल्वे स्थानकाशीनजिकच्या प्रमुख मार्गाने जोडावे, असा प्रस्तावही त्यांनी ठेवला आहे.
वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन हे गाव पार्श्वनाथ अंतरिक्ष तीर्थ स्थानामुळे जैनांची काशी म्हणून संपूर्ण देशात परिचित आहे. या ठिकाणी नियमित गुजरात, मुंबई बेंगळुरू, हैदराबाद, राजस्थानसह देशातील विविध भागातून जैन भाविक येत असतात. या भाविकांना अकोला किंवा वाशिम रेल्वे स्थानकावर उतरावे लागते. तेथून खाजगी गाड्यांचा आधार घेऊन मालेगाव मार्गे शिरपूर येथे यावे लागते. हे यात्रेकरूंसाठी त्रासाचे ठरते. त्यामुळे शिरपूर जैन तीर्थक्षेत्रासाठी रेल्वे सुविधा करावी आणि यासाठी शिरपूर जैनलानजिकच्या प्रमुख रेल्वे मार्गाने वाशिम रेल्वे स्थानकाशी जोडावे. त्यामुळे येथे येणाºया भाविकांचा अकोला, वाशिमचा फेरा टाळला जाऊ शकतो, अशी मागणी रिसोड मतदार संघाचे आमदार अमित झनक यांनी विधानसभेच्या अधिवेशनात पुरवणी मागणीत केली. त्याशिवाश वाशिम जिल्ह्यात होणाºया राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्याप्रमाणेच नजिकच्या इतर लहान रस्त्याचाही विकास करावा, रिसोड शहरातील नगर परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या; परंतु बांधकाम विभागाकडे दायित्व असलेल्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी द्यावा, वाकद, गोहगाव (हाडे) दरम्यानचा नादुरुस्त पुल दुरुस्त करण्यासह रिसोड तालुक्यात औद्योगिक वसाहतीची सुविधा आणि मालेगाव येथील औद्योगिक वसाहतीसाठी राखीव जागेत उद्योग उभारणीसाठी चालना देण्यात यावी, आदि मागण्याही त्यांनी केल्या आहेत.