सनगाव-शेंदुरजना आढाव रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:42 AM2021-03-31T04:42:03+5:302021-03-31T04:42:03+5:30
वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील सनगाव-शेंदुरजना आढाव रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. रस्त्यावरील डांबरीकरण नाहीसे होऊन खडी उघडी पडली, तसेच ...
वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील सनगाव-शेंदुरजना आढाव रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. रस्त्यावरील डांबरीकरण नाहीसे होऊन खडी उघडी पडली, तसेच मोठमोठे खड्डे पडल्याने चालकांना या रस्त्यावर वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी वाहनचालक व ग्रामस्थांकडून होत आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील धानोरा-शेंदुरजना आढाव या ११ किलोमिटर अंतराच्या रस्त्यामधील सनगाव ते शेंदुरजना या ८ किलोमिटर अंतराच्या रस्त्यावरील डांबरीकरण नाहीसे होऊन ठिकठिकाणी खडी उघडी पडली, तर मोठमोठे खड्डेही तयार झाले. या रस्त्याने बंजारा बांधवांची काशी मानल्या जाणाºया पोहरादेवी येथे हिंगोली, परभणी, नांदेड, औरंगाबाद, अकोला येथील शेकडो भाविक विविध वाहनाने प्रवास करतात. शिवाय शेंदुरजना ही मोठी बाजारपेठ असून, येथे मोठे महाविद्यालय व शाळाही आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह व्यावसायिक आणि इतर लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रवास या रस्त्याने होत असतो. तथापि, गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याची अवस्था वाईट असतानाही दुरुस्ती करण्याची तसदी घेतली जात नाही. त्यामुळे चालकांसह प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान, चार महिन्यांपूर्वी शेंदुरजना आढावनजीक काही अंतरातील रस्त्याचे खडीकरण करण्यात आले; परंतु डांबरीकरण झालेले नसून, या ठिकाणी डांबरीकरण करण्यासह संपूर्ण रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी विष्णू आढाव, पंजाब आडे, गणेश जाधव, प्रमोद आडे, किशोर पवार, राम राठोड, किशोर पोफळे आदिंनी केली आहे.