मंगरुळपीर येथील बंद पथदिवे सुरू करण्याची प्रहारची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:54 AM2021-06-16T04:54:32+5:302021-06-16T04:54:32+5:30
मंगरुळपीर शहरात राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे शहराला दुभाजकासह चौपदरी रस्ते मिळाले आहेत. मानोरा रोड ते ...
मंगरुळपीर शहरात राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे शहराला दुभाजकासह चौपदरी रस्ते मिळाले आहेत. मानोरा रोड ते अकोला मार्गाच्या खरेदी-विक्री संघापर्यंत तसेच शेलगाव फाटा ते वाढा फाटा या भागापर्यंत दुभाजकांसह लाखो रुपयांचा निधी खर्च करून अत्याधुनिक पथदिवे बसविण्यात आले आहेत. मात्र, हे पथदिवे पालिकेने ताब्यात घेऊन कार्यान्वित करणे व नियमित देखभाल, दुरुस्ती करणे आवश्यक आहे; परंतु या कामात पालिकेला काही अडचणी आल्या असून त्यामुळे नागरिकांचे स्वप्न हवेतच विरत चालले आहे. पालिकेने रस्त्याचे कंत्राटदर व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार पत्र देऊन महामार्गाच्या कामामुळे प्रभावित झालेल्या जोडरस्त्यांची यादी देऊन हे जोडरस्ते पूर्ण करून देण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत जोडरस्ते करून मिळत नाही तोपर्यंत पथदिव्यांचा ताबा न घेण्याची भूमिका पालिकेने घेतल्याचे कळते. ही भूमिका रास्त असली तरीही यात नागरिक मात्र दोन यंत्रणांच्या समन्वय व मतभेदांचा फटका शहरातील हजारो नागरिकांना बसत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून याप्रकरणी होणारी मागणी पाहता प्रहारच्या विधिमंडळ कार्यालयाकडून याप्रकरणी नगर विकास मंत्रालयाचे प्रधान सचिवांना पत्रव्यवहार करण्यात आला. नगर विकास विभागाने प्रहारच्या या पत्रावरून जिल्हाधिकारी वाशिम यांना पत्र पाठविले आहे. याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यास सांगितले असून शासनास अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
-----------------------------------------------------
शासन व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दखल
मंगरुळपीर शहरातील पथदिवे सुरू व्हावे ही सर्वसामान्यांची इच्छा आहे. त्यासाठी प्रहारने सुद्धा पुढाकार घेतला असून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. नगर विकास विभागाने याप्रकरणी कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी, वाशिम यांना कळवून अहवाल मागितला आहे. त्यासंबंधाने आज, सोमवार दि.१४ जून रोजी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांची भेट घेऊन या प्रश्नावर चर्चा केली असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन मंगरुळपीर शहरवासीयांची भावना पाहता पथदिव्यांचा प्रश्न शक्य तितक्या लवकर मार्गी लावू, असे आश्वासन दिले आहे, अशी माहिती प्रहार जनशक्ती विधान मंडळ पक्ष कार्यालयाचे सहसचिव अविनाश पाकधने यांनी दिली.