उडदाला मागणी भारी; दराला हमीपेक्षा ५०० रुपये उभारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:44 AM2021-09-18T04:44:15+5:302021-09-18T04:44:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्ह्यात सोयाबीननंतर आता कडधान्य पिकाच्या दरातही तेजी येत आहे. नव्या हंगामातील उडीद, मुगाची काढणी ...

Demand for Udda is huge; Raise the rate by Rs. 500 more than the guarantee! | उडदाला मागणी भारी; दराला हमीपेक्षा ५०० रुपये उभारी !

उडदाला मागणी भारी; दराला हमीपेक्षा ५०० रुपये उभारी !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : जिल्ह्यात सोयाबीननंतर आता कडधान्य पिकाच्या दरातही तेजी येत आहे. नव्या हंगामातील उडीद, मुगाची काढणी झाली असून, या शेतीमालाची आवक बाजारात वाढत आहे. त्यात यंदा देशात पावसाच्या अनियमिततेमुळे उडदाच्या उत्पादनात मोठी घट आल्याने या शेतमालाची मागणी वाढली आहे. परिणामी उडदाला हमीदरापेक्षा ५०० ते ७०० रुपये अधिक दर मिळत असल्याचे बाजारातील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

राज्यात गेल्या काही वर्षांत उडीद, मूग या कडधान्याच्या पेऱ्यात जवळपास ६० टक्के घट आली आहे. वाशिम जिल्ह्यात यंदाही अपेक्षित क्षेत्राच्या तुलनेत केवळ ४० टक्के क्षेत्रावर उडदाची पेरणी झाली. त्यात यंदा पावसाच्या अनियमिततेमुुळे या पिकाच्या उत्पादनात घट आली असताना, उडदाची मागणी वाढली आहे. याच कारणामुळे उडदाच्या दरात अचानक तेजी आली आहे. शासनाने या शेतमालास ६३०० रुपये हमीदर घोषित केला असताना, बाजार समित्यांत सरासरी ६६०० ते ६७५० रुपये प्रती क्विंटल दराने उडदाची खरेदी होत आहे.

००००००००००००००००००

हलक्या दर्जाच्या मालासही भाव

यंदा उडदाच्या शेंंगा परिपक्व झाल्या असतानाच पावसाने धडाका लावला. त्यामुळे उडदाचा दर्जा घसरला, शिवाय उडदात मोठ्या प्रमाणात ओलावाही निर्माण झाला. असे असतानाही निम्न प्रतीच्या उडदालाही ५६०० ते ५८०० रुपये प्रती क्विंटलला दर मिळू लागला आहे. त्यामुळे किमान शेतकऱ्यांनी लावलेला पैसा तरी वसूल होत आहे.

---------------

राजस्थान, मध्य प्रदेशात उत्पादन घटल्याचा परिणाम

महाराष्ट्रात अती पावसाचा फटका उडदाला बसला, तर उडदाचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या राजस्थान आणि मध्य प्रदेशात यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने उडदाच्या उत्पादनात मोठी घट आली. हीच स्थिती देशातील इतरही उडीद उत्पादक राज्यांत कमी-अधिक प्रमाणात असल्यामुळे राष्ट्रीय स्तरावरच उडदाला मागणी वाढून या शेतमालाच्या दरात तेजी आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

-------------

व्यापाऱ्यांच्या मते पुढे आणखी तेजी

कोट:

राजस्थान आणि मध्य प्रदेशात यंदा उडदाचे उत्पादन घटले, तर महाराष्ट्रातही अती पावसाने उडदाचे उत्पादन घटण्यासह दर्जावरही परिणाम झाला. त्यामुळे उडदाची मागणी वाढली आहे. सध्या या शेतीमालात ओलावा असून, पुढे दर्जेदार मालाचे दर अधिक वाढणार आहेत.

- आनंद चरखा,

संचालक, बालाजी कृषी बाजार तथा

व्यापारी युवा मंडळ अध्यक्ष, वाशिम

०००००००००००००००००००००

शेतकरी म्हणतात... पैसा वसूल

कोट:

यंदा पावसामुळे उडदाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. शिवाय मालाचा दर्जाही खालावला. त्यामुळे या पिकाची काढणीच करावी की नाही, असा विचारही येऊ लागला होता; परंतु आता दर वाढल्याने किमान लागलेला पैसा तरी वसूल होण्याची आशा आहे.

- सुरेंद्र काळेकर,

उडीद उत्पादक शेतकरी,

०००००००००००००००००००००

कोट:

यंदा सततच्या पावसामुळे उडदावर परिणाम होऊन उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. मालाची प्रतही खालावल्याने लावलेला खर्चही निघतो की नाही, अशी भीती वाटत होती; परंतु आता दर वाढल्याने या पिकावर केलेला किमान खर्च तरी वसूल झाला आहे.

- गणेय हळदे,

उडीद उत्पादक शेतकरी,

Web Title: Demand for Udda is huge; Raise the rate by Rs. 500 more than the guarantee!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.