व्हिटॅमीन सी, बी कॉम्प्लेक्स गोळ्यांची मागणी वाढली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:42 AM2021-04-27T04:42:08+5:302021-04-27T04:42:08+5:30
वाशिम : कोरोना विषाणू संसर्र्गापासून बचावात्मक पवित्रा म्हणून रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या व्हिटॅमीन सी, बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या घेण्याकडे अनेकांचा कल असून, ...
वाशिम : कोरोना विषाणू संसर्र्गापासून बचावात्मक पवित्रा म्हणून रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या व्हिटॅमीन सी, बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या घेण्याकडे अनेकांचा कल असून, गत दोन महिन्यांत या गोळ्यांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. दुसरीकडे सुरक्षितता म्हणून मास्क, सॅनिटाझरचा वापरही वाढला आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण असल्याचे दिसून येते. कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव म्हणून मास्कचा वापर, सॅनिटायझरने हात वारंवार धुणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविणे आदी उपाय सांगितले जात आहे. त्यानुसार खबरदारी म्हणून मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याकडे नागरिक वळल्याने मागणीत अचानक वाढ झाल्याचे दिसून येते. जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. यानंतर कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत गेली. जुलै, ऑगस्ट महिन्यांत तर कोरोनाने अक्षरश: हाहाकार माजविला. या कालावधीत नागरिकांकडून मास्क व सॅनिटायझरचा नियमित वापर केला जाऊ लागला. मात्र, डिसेंबरनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आणि सॅनिटायझर, मास्कच्या मागणीतही घट झाली. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. दररोज सरासरी ३५० रुग्ण आढळून येऊ लागल्याने नागरिकांनी भलतीच धास्ती घेतली आहे. त्यामुळे जो-तो स्वत:च्या कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी घेत आहे. पुन्हा एकदा मास्क, सॅनिटायझर, विविध प्रकारचे हॅण्डवॉश, साबणाच्या मागणीत वाढ झाली आहे. यासोबतच व्हिटॅमीन सी, बी कॉम्प्लेक्स गोळ्यांची मागणी वाढली आहे.
०००
बॉक्स
सॅनिटायझरची मागणी ९५ टक्के
नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत मास्क, सॅनिटायजरची मागणी घटली होती. मार्च २०२१ पासून मास्क, सॅनिटायझरची मागणी वाढली असून, ९५ टक्क्यांवर गेली आहे.
यंदा मास्कलादेखील मागणी वाढली आहे.
रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व्हिटॅमीन सी, बी कॉम्प्लेक्स गोळ्यांची मागणीही ६० टक्क्यांवर गेली आहे.
०००
कोट
दोन महिन्यांपासून व्हिटॅमीन सी, बी कॉम्प्लेक्स गोळ्यांची मागणी वाढली आहे. मास्क आणि सॅनिटायझरच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे.
- मनोज नेनवाणी
संचालक, मेडिकल स्टोअर्स, वाशिम