बियाण्याचे उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:42 AM2021-04-27T04:42:57+5:302021-04-27T04:42:57+5:30
प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन तसेच ग्रामस्तरावर हा उपक्रम राबविण्यात आला. खरीप हंगाममध्ये शेतकरी अनेकवेळा स्वतःकडील बियाणे वापरतात; परंतु या ...
प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन तसेच ग्रामस्तरावर हा उपक्रम राबविण्यात आला.
खरीप हंगाममध्ये शेतकरी अनेकवेळा स्वतःकडील बियाणे वापरतात; परंतु या बियाण्याची उगवण क्षमता तपासणी करणे गरजेचे आहे. यामुळे शेतकऱ्यांची बियाणे उगवणबाबत होणारी फसवणूक टाळता येऊ शकते, असे मत कृषी सहायक संजय जहागीरदार व रुस्तुम सोनवने यांनी व्यक्त केले. यावेळी सरपंच शुभांगी वायकर, उपसरपंच नंदकिशोर वनस्कर व शेतकरी प्रवीण वायकर, शुभानंद बेलोकर, नंदकिशोर पाठक, रामभाऊ काटकर, संतोष राऊत, बालू महाजन, पप्पू राजेकर, अनंत बेलोकर, आदी उपस्थित होते.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत गावोगावी असे प्रशिक्षण आयोजित केले जात आहेत. प्रात्यक्षिक नमुना- माल साठवून ठेवण्यासाठी असलेले पोत्याचे चौकोनी तुकडे करून, ते ओले करून त्यावर शंभर दाणे मोजून ते दीड ते दोन सेंटीमीटर अंतरावर दहा-दहाच्या रांगेमध्ये ठेवावेत, त्यावर हलकेसे पाणी शिंपडावे व त्याची गुंडाळी करून सावलीत ठेवावे. एक-दोन दिवसांनंतर अधूनमधून त्या गोणपाटावर पाणी मारावे, सहा ते सात दिवसांनंतर शंभरपैकी ७० बियाणे उगवण झालेले असतील, तर ते बियाणे पेरणी योग्य समजून पेरणीसाठी वापरावे. या बियाणे उगवण क्षमता चाचणीमुळे शेतकऱ्यांची बियाणे उगवणीबाबत खात्री होते व बियाणे न उगवण्याचा व पेरणी खर्च वाचतो.
ज्या बियाण्याची उगवण क्षमता चाचणी झालेली आहे, असे बियाणे पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करून पेरणी केल्यास उगवण क्षमता चांगली होऊन उत्पादनात २५ ते ३० टक्के निश्चित वाढ होते. शेतकऱ्यांनी कमी खर्चाची अशी उपाययोजना करून होणारे नुकसान टाळावे, असे आवाहन कृषी विभागाचे कृषी सहायक संजय जहागीरदार यांनी केले आहे.