करडईचे क्षेत्र वाढविण्याची कृषी विभागाची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:47 AM2021-09-21T04:47:17+5:302021-09-21T04:47:17+5:30
महाज्योती योजना ही ओबीसी, व्ही.जे.एन.टी.एस.बी.सी. या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी आहे. या प्रवर्गातील शेतकऱ्यांना करडई लागवडीकरिता प्रोत्साहन म्हणून प्रतिएकर रक्कम २२०० ...
महाज्योती योजना ही ओबीसी, व्ही.जे.एन.टी.एस.बी.सी. या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी आहे. या प्रवर्गातील शेतकऱ्यांना करडई लागवडीकरिता प्रोत्साहन म्हणून प्रतिएकर रक्कम २२०० रुपये निविष्ठाकरिता मिळणार आहेत. यामध्ये क्लस्टर धर्तीवर करडई लागवड राबविणे अपेक्षित असून, करडई बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची महाज्योतीवर नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरल्याची प्रत, आधारकार्ड प्रत, ७/१२, -८ अ, बँक पासबुक झेरॉक्स प्रत, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ही कागदपत्रे बियाणे घेताना सोबत घेऊन यावी लागणार आहे. वाशिम तालुक्यात तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे हे या संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. अडचण आल्यास आपण प्रमुख तेलबिया संशोधन केंद्र पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी अनिल कंकाळ यांनी केले आहे.
-----------
बियाणेवाटपाचे नियोजन
करडईचा पेरा वाढविण्यासाठी महाज्योती अभियानांतर्गत कृषी विभागाची धडपड सुरू असून, या योजनेत नाेंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना बियाणे वितरणचे नियोजन करण्यात येत आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना वाटपाची तारीख लवकरच कळविणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.