पिकावरील किडींवर कृषी विभागाचा विशेष ‘वाॅच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:46 AM2021-08-14T04:46:45+5:302021-08-14T04:46:45+5:30

वाशिम : पिकांवरील कीडरोगांचे शास्त्रोक्त पद्धतीने सर्वेक्षण करणे व त्यावरील व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना वेळीच सतर्क करणे, या उद्देशातून राबविण्यात येत ...

Department of Agriculture's special 'watch' on crop insects | पिकावरील किडींवर कृषी विभागाचा विशेष ‘वाॅच’

पिकावरील किडींवर कृषी विभागाचा विशेष ‘वाॅच’

Next

वाशिम : पिकांवरील कीडरोगांचे शास्त्रोक्त पद्धतीने सर्वेक्षण करणे व त्यावरील व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना वेळीच सतर्क करणे, या उद्देशातून राबविण्यात येत असलेल्या ‘क्रॉपसॅप’ प्रकल्पाच्या माध्यमातून विशेषत: सोयाबीन पिकावरील किडींवर कृषी विभागाने विशेष कटाक्ष ठेवला आहे. याअंतर्गत २४८ कर्मचारी सक्रिय असून आठवड्यातून दोनवेळा ९९२ ठिकाणी कीड सर्वेक्षण केले जात आहे.

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत खरीप हंगामामध्ये इतर पिकांच्या तुलनेत सोयाबीनचा सर्वाधिक पेरा होत आहे. यावर्षीही ४ लाख ६ हजार ४५० हेक्टरपैकी तब्बल ३ लाख ४ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झालेली आहे. दरम्यान, दरवर्षी सोयाबीन हे पीक ऐन भरात असताना हवामानाच्या लहरीपणामुळे खोड पोखरणाऱ्या, पाने खाणाऱ्या, रस शोषणाऱ्या, फुले आणि शेंगा खाणाऱ्या विविध स्वरूपातील कीडरोगांचा प्रादुर्भाव होतो. यामुळे प्रत्यक्ष उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट येते. सन २००८-०९ मध्ये अचानक उद्‌भवलेल्या किडींच्या उद्रेकामुळे सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले होते. तशी परिस्थिती पुन्हा उद्‌भवू नये, यासाठी २००९-१० मध्ये राज्यात राष्ट्रीय कृषी विभाग योजनेखाली ‘क्रॉपसॅप’ हा पिकांवरील कीड, रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प हाती घेण्यात आला. त्याचा वाशिम जिल्ह्यालाही अपेक्षित लाभ मिळत असून विशेषत: सोयाबीनवरील कीडरोगांचे वेळीच व्यवस्थापन करणे शक्य होत असल्याने शेतकऱ्यांच्या एकरी उत्पन्नात वाढ झालेली आहे.

.........................

प्रत्येक आठवड्यात कीड सर्वेक्षण

जिल्ह्यात ‘क्रॉपसॅप’प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांच्या मोबाइलवर विशेषत: सोयाबीनवरील कीडरोगांच्या प्रादुर्भावासंबंधी अवगत करणारे एसएमएस पाठविण्यात येत आहेत. चालूवर्षीच्या खरीप हंगामात १९२ कृषी सहायक, ३२ कृषी पर्यवेक्षक, १६ मंडळ कृषी अधिकारी, सहा तालुका कृषी अधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकारी असे एकूण २४८ कर्मचारी याकामी सक्रिय करण्यात आले आहेत. याअंतर्गत दोन गट पाडून सोमवार ते बुधवार आणि गुरुवार ते शुक्रवार असे पाच दिवस प्रत्येकी ४९६ याप्रमाणे ९९२ ठिकाणी कीड सर्वेक्षण करण्यात येत आहे.

..................

जिल्ह्यातील सोयाबीन किडींपासून सुरक्षित

यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीपासूनच सोयाबीनला पोषक असे हवामान मिळाल्याने खोडमाशी, तंबाखूची पाने खाणारी अळी, चक्रीभुंगा, उंटअळीचा विशेष प्रादुर्भाव पिकावर झालेला नाही. त्यामुळे सोयाबीन सध्यातरी आर्थिक नुकसान पातळीच्या खाली आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून प्राप्त झाली.

..................

एम-किसान पोर्टलवर नोंदणी आवश्यक

‘क्रॉपसॅप’प्रकल्पांतर्गत पिकांवरील कीडरोगांच्या व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना एसएमएसव्दारे शास्त्रोक्त व मोफत सल्ला दिला जातो; मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या एम-किसान पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

..................

कोट :

जिल्ह्यात दरवर्षी खरीप हंगामात सोयाबीनचा विक्रमी पेरा केला जातो. यावर्षीही ३ लाख हेक्टरपेक्षा अधिक शेती सोयाबीनने व्यापली आहे. ‘क्रॉपसॅप’प्रकल्पाच्या माध्यमातून २४८ कर्मचारी कीडरोगांवर विशेष लक्ष ठेवून आहेत. यावर्षी अनुकूल वातावरण असल्याने सोयाबीनवर किडींचा विशेष प्रादुर्भाव झालेला नाही. हे पीक सध्यातरी आर्थिक नुकसान पातळीच्या खाली आहे.

- एस.एम. तोटावार

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

Web Title: Department of Agriculture's special 'watch' on crop insects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.