पशुसंवर्धन विभागानेच जाळली जनावरांची औषधी!
By admin | Published: March 3, 2017 08:22 PM2017-03-03T20:22:50+5:302017-03-03T20:22:50+5:30
मालेगाव येथील प्रकार; पशुसंवर्धन अधिका-यांनी दिला चौकशीचा आदेश
वाशिम : मालेगाव येथील पशुसंवर्धन विकास अधिकार्यांच्या दवाखान्यालगतच, जनावरांसाठी उपयुक्त असणारी शासकीय औषधी काही अधिकार्यांनी जाळून नष्ट केल्याचा धक्कादायक प्रकार शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी गुरुवारी दुपारी उघडकीस आणला. यासंदर्भात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर.ए. कल्यापुरे यांच्याकडे तक्रार येताच, चौकशीचा आदेश देण्यात आला.
ग्रामीण भागातील जनावरांवर तातडीने व अत्यल्प दरात तसेच मोफत उपचार मिळावे म्हणून पशुसंवर्धन उपचार केंद्र व दवाखान्याची सुविधा उपलब्ध केली आहे. या दवाखान्यांत लाखमोलाचा औषधी साठाही पुरविला जातो. मालेगाव येथील पशुसंवर्धन विकास अधिकार्यांच्या दवाखान्यामागील मोकळ्या जागेत गुरुवारी दुपारच्या सुमारास जनावरांची औषधी जाळून नष्ट करण्यात आली. ही बाब शिवसेना उपतालुका प्रमुख भगवान बोरकर यांच्या निदर्शनात येताच घटनास्थळी शिवसैनिक जमा झाले. यावेळी न जळालेली काही औषधी पुरावा म्हणून घेण्यात आली. यापैकी काही औषधीवर ह्यएक्स्पायरी डेटह्ण ही फेब्रुवारी २0१८ असल्याचे नमूद आहे. आणखी एक वर्षभर मुदत असतानाही औषधी जाळून का टाकण्यात आली, यामागे मोठे घबाड तर नाही ना? या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी भगवान बोरकर, गजानन बोरचाटे, गजानन केंद्रे आदींनी केली आहे.