१० रुपयांचे ४० हजार ‘क्वॉइन्स’ बँकांमध्ये ‘डिपॉझिट’!
By admin | Published: March 3, 2017 01:15 AM2017-03-03T01:15:34+5:302017-03-03T01:15:34+5:30
नाणे बंदची अफवा : बँकांची डोकेदुखी वाढली!
सुनील काकडे
वाशिम, दि.२ - जिल्ह्यात गत काही दिवसांपासून १० रुपयांचे ‘क्वॉइन्स’ बंद झाल्याची अफवा झपाट्याने पसरली. परिणामी, गत २ दिवसांमध्ये १० रुपयांचे तब्बल ४० हजार ‘क्वॉइन्स’ विविध बँकांमध्ये ‘डिपॉझिट’ झाले आहेत. मात्र, १० रुपयांच्या ‘क्वॉइन्स’ बंदबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अग्रणी बँकेकडून करण्यात आले आहे.
८ नोव्हेंबर २०१६ पासून चलनातून ५०० आणि हजारच्या नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसोबतच व्यापारपेठेतील व्यावसायिकही हैराण झाले.
दरम्यान, नोटाबंदीचे विदारक परिणाम आता बहुतांशी कमी झाले असताना, १० रुपयांचे ‘क्वॉइन्स’ चलनातून बाद झाल्याच्या अफवेने डोके वर काढल्याने संपूर्ण जिल्ह्यात मोठा गोंधळ उडाला आहे.
ही अफवा एवढ्या गतीने पसरली, की मुख्य व्यापारपेठेतील एकही दुकानदार १० रुपयांचे नाणे स्वीकारायला तयार नाही. त्यामुळे जवळ जमविलेली १० रुपयांची नाणी बँकांमध्ये ‘डिपॉझिट’ करण्यासाठी संबंधितांची चांगलीच धांदलघाई उडाली आहे. यामुळे मात्र राष्ट्रीयीकृत बँक कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला असून, मोठ्या संख्येत प्राप्त होणारे १० रुपयांचे ‘क्चॉइन्स’ नेमके ठेवायचे तरी कुठे, या प्रश्नाने बँकांना ग्रासले आहे.
मुद्रा अवमूल्यन करणाऱ्यांविरोधात फौजदारीचे प्रावधान - विजय नगराळे
चलनातून १० रुपयांचे ‘क्वॉइन्स’ बंद झालेले नाहीत. त्यामुळे कुठल्याच छोट्या अथवा मोठ्या व्यापाऱ्याला हे नाणे नाकारण्याचा अधिकार नाही. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता व्यवहार सुरू ठेवावेत, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे यांनी केले. सोबतच व्यवहारात नाणे नाकारून मुद्रा अवमूल्यन करणाऱ्यांविरोधात वेळप्रसंगी फौजदारी दाखल करण्याचे प्रावधान असल्याची माहितीदेखील नगराळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
१२ प्रकारचे ‘क्वॉइन्स’ चलनात ग्राह्य!
१० रुपयांच्या ‘क्वॉईन्स’बाबत आरबीआयने दिलेल्या स्पष्टीकरणात १२ प्रकारच्या ‘डिझाइन्स’चे नाणे चलनात ग्राह्य असल्याचे सांगितले आहे. आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील बदलाचे प्रतिबिंब म्हणून वेळोवेळी नवनव्या डिझाईन्समध्ये नाणे बनविल्या जातात, असे आरबीआयने नमूद केले आहे.
केवळ ‘एसबीआय’मध्येच ‘आरबीआय’ची तिजोरी!
जिल्ह्यात एकंदरित १९ राष्ट्रीयीकृत बँका कार्यान्वित आहेत. मात्र, स्टेट बँक आॅफ इंडियाचा अपवाद वगळता इतर १८ बँकांमध्ये ‘आरबीआय’ची तिजोरी (चेस्ट) नाही. अशा स्थितीत अचानक बँकांमध्ये ‘डिपॉझिट’ होत असलेले लाखो रुपयांचे १० रुपयांचे ‘क्वॉइन्स’ ठेवावे कुठे, या प्रश्नाने बँका त्रस्त झाल्या आहेत.