देपूळच्या ‘त्या’ रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह; झिका व्हायरसचा जिल्ह्यात शिरकाव नाही!
By संतोष वानखडे | Published: July 17, 2024 01:40 PM2024-07-17T13:40:38+5:302024-07-17T13:40:55+5:30
पावसाळ्यात साथीचे आजार वाढण्याचा धोका अधिक असतो. राज्याच्या काही भागात सध्या ‘झिका व्हायरस’चा धोका वाढत आहे.
वाशिम : वाशिम तालुक्यातील देपूळ येथील एका संशयित महिला रुग्णाचा ‘झिका व्हायरस’संदर्भात पाठविलेला आरटीपीसीआर नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. जिल्ह्यात झिका व्हायरसचा शिरकाव नसून, खबरदारी म्हणून प्रत्येक नागरिकाने स्वच्छता पाळावी, घर परिसरात डासाची उत्पत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
पावसाळ्यात साथीचे आजार वाढण्याचा धोका अधिक असतो. राज्याच्या काही भागात सध्या ‘झिका व्हायरस’चा धोका वाढत आहे. पुणे येथून देपूळ येथे परतलेल्या एका महिलेला काही दिवसांपूर्वी ताप आला. सांधे देखील दुखायला लागले. त्यामुळे ती उपचारासाठी वाशिम येथील खासगी डाॅक्टर अतुल काळुशे यांच्याकडे गेली होती. काही ठराविक तपासण्या केल्या असता तिच्यात ‘झिका’सदृश विशिष्ट लक्षणे आढळून आल्याने संबंधित रुग्णाचा आरटीपीसीआर नमुन्याचा अहवाल तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविला होता.
या नमुना चाचणीचा अहवाल प्राप्त झाला असून, तो निगेटिव्ह असल्याचे आरोग्य विभागाने बुधवारी स्पष्ट केले. पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांनी आरोग्य जपावे, घर परिसरात स्वच्छता पाळावी असा सल्ला जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. अनिल कावरखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. पांडूरंग ठोंबरे यांनी दिला.