दोनदा अडवूनही तस्कर रेती टाकून पळाला; दोघांवर गुन्हा!
By सुनील काकडे | Published: May 18, 2024 05:24 PM2024-05-18T17:24:27+5:302024-05-18T17:24:37+5:30
पिंपळखुटा (ता.मंगरूळपीर) येथे घडलेल्या या घटनेप्रकरणी मंडळ अधिकाऱ्यांकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून चालक आणि मालकावर गुन्हा नोंदविण्यात आला.
वाशिम : मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनी कार्यवाहीदरम्यान दोनदा अडवूनही तस्कराने रेती टाकून वाहनासह पोबारा केला. पिंपळखुटा (ता.मंगरूळपीर) येथे घडलेल्या या घटनेप्रकरणी मंडळ अधिकाऱ्यांकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून चालक आणि मालकावर गुन्हा नोंदविण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार, पार्डी ताडचे मंडळ अधिकारी देवेंद्र मुकूंद यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, पिंपळखुटा येथे ते व तलाठी स्वाती गोविंदराव गाडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर अवैध रेतीची वाहतूक करत असलेला ट्रॅक्टर थांबविला. मात्र, चालकाने वाहन भरधाव वेगात तऱ्हाळाच्या दिशेने पळविले. त्याचा पाठलाग करून मसोला-पिंपळखुटा शिवरस्त्यानजिक ट्रॅक्टर अडवून विचारणा करण्यात आली. चालकाकडे परवाना नसल्याचे आढळून आले. जप्ती व पंचनामा कार्यवाही सुरू असताना चालकाने ट्राली उलटवत रेती रस्त्यात टाकून पुन्हा वाहनासह पोबारा केला. चालकाची ओळख पटली असून तो देवानंद मधुकर गिरी (पिंपळखुटा) आहे. तसेच ट्रॅक्टर मालकाचे नाव अंबादान विठ्ठल परंडे आहे. अशा तक्रारीवरुन दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला.