कडक निर्बंध लागू असतानाही आढळले २४२४ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:40 AM2021-05-14T04:40:55+5:302021-05-14T04:40:55+5:30
जिल्ह्यात फेब्रुवारी २०२१ या महिन्यापर्यंत रुग्णसंख्या वाढीचा आलेख आटोक्यात होता. २८ फेब्रुवारीअखेर जिल्हाभरात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८ हजार ९३४ ...
जिल्ह्यात फेब्रुवारी २०२१ या महिन्यापर्यंत रुग्णसंख्या वाढीचा आलेख आटोक्यात होता. २८ फेब्रुवारीअखेर जिल्हाभरात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८ हजार ९३४ होती; तर कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा १६० इतका होता. त्यानंतर मात्र सातत्याने रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मार्च महिन्यात ७ हजार १४१, एप्रिल महिन्यात ११ हजार ३८५ आणि १ मे ते १३ मे या कालावधीत ६ हजार १४१ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. ९ मेपासून जिल्हाभरात कडक निर्बंध लागू करण्यात आल्याने रुग्णसंख्येचा आलेख कमी होईल, अशी अपेक्षा वर्तविण्यात येत असतानाच, ९ मे रोजी ४६९, १० मेस ४७२, ११ मेस ४६७, १२ मेस ४२८ आणि १३ मे रोजी ५८८ असे पाच दिवसांत एकूण २,४२४ रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
........................
बाॅक्स :
नव्या रुग्णांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक
कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत बाधित आढळणाऱ्या रुग्णांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे साधारणत: २५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या तरुणांचे आहे. १ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील तरुण व इतर नागरिकांना कोरोना लस दिली जाणार होती; मात्र शासनाने हा निर्णय फिरवून पहिला डोस घेतलेल्या ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना आधी दुसरा डोस देण्याचे निश्चित केले. यामुळे तरुण वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे.
.....................
गत पाच दिवसांत आढळलेले नवे रुग्ण
९ मे - ४६९
१० मे - ४७२
११ मे - ४६७
१२ मे - ४२८
१३ मे - ५८८