डीएड, बीएडच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना देता येणार टीईटी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:29 AM2021-09-02T05:29:06+5:302021-09-02T05:29:06+5:30
वाशिम : डीएड, बीएड च्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना देखील शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) अर्ज भरता येणार आहे. ...
वाशिम : डीएड, बीएड च्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना देखील शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, केवळ टीईटी नको, शिक्षक नोकरभरतीही सुरू करा, असाही सूर विद्यार्थ्यांमधून उमटत आहे.
कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून शिक्षण क्षेत्राला जबर फटका बसला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपासून शिक्षक पात्रता परीक्षा होऊ शकली नाही. दोन वर्षांनंतर ऑक्टोबर महिन्यात महाटीईटी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत टीईटी-२०२१ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यावर्षी फॉर्म ऑनलाईन भरण्याच्या प्रक्रियेमध्ये डीएड आणि बीएड अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना या परीक्षेची संधी देण्यात सुरुवातीला देण्यात आली नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता. अखेर शासनाने अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना टीईटी देण्याची संधी देण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
००००००००००००
५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार
डीएड आणि बीएडच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी म्हणून ३ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर अशी दीर्घ मुदत देण्यात आलेली आहे. कोरोनामुळे डीएड आणि बीएड विद्यार्थ्यांची अंतिम वर्षाची परीक्षा वेळेवर घेण्यात आलेली नाही आणि त्याचा निकालही लागला नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना महाटीईटी देता येणार नाही आणि त्यानंतर होणारी अभियोग्यता चाचणीदेखील देता येणार नाही, असे सांगत विविध संघटनांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. त्यानुसार ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली.
०००००००००००
विद्यार्थी म्हणतात..
शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना संधी मिळाल्याने दिलासा मिळाला आहे. टीईटी प्रमाणेच शिक्षक नोकरभरती देखील सुरू करणे अपेक्षित आहे. अंतिम वर्षात असताना टीईटी देता आली तर ही परीक्षा लवकर उत्तीर्ण होऊन नोकरीच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना प्रयत्न करणे अधिक सुलभ होईल.
- मिलिंद सरकटे, विद्यार्थी.
००००००
शिक्षक पात्रता परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास ५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने वाशिमसह राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. शिक्षण सुरू असतानाच परीक्षा देण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
- शीतल वानखेडे, विद्यार्थिनी
००००००००००००००
डीएडच्या अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी - १२६
बीएडच्या अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी - ११०