निवडणूक कामकाज प्रभावित न करता आंदोलन करण्याचा निर्धार
By Admin | Published: November 8, 2016 02:05 AM2016-11-08T02:05:48+5:302016-11-08T02:05:48+5:30
तलाठी, ग्रामसेवकांचा सहभाग; प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याची मागणी.
वाशिम, दि. ७- प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता तलाठी, मंडळ अधिकारी आणि ग्रामसेवकांनी चार टप्प्यात सोमवार, ७ नोव्हेंबरपासून असहकार आंदोलनास सुरूवात केली आहे. यामुळे मात्र नगर परिषद निवडणूक कामकाजावर परिणाम होणार असून निवडणूक प्रशिक्षण वर्गालाही अल्प प्रतिसाद मिळाला.
येत्या २७ नोव्हेंबरला जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर आणि कारंजा या तीन नगर परिषदांची निवडणूक होऊ घातली आहे. त्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यरत तलाठी आणि ग्रामसेवकांवर निवडणूक कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, यादरम्यान ग्रामसेवक, तलाठी आणि मंडळ अधिकार्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे निवडणूकीच्या कामकाजावर बहुतांशी परिणाम जाणवण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.
ग्रामसेवकांचे आंदोलन चार टप्प्यात होणार असून दुसर्या टप्प्यात ११ नोव्हेंबरला जिल्हा परिषदेसमोर एकदिवसीय धरे आंदोलन केले जाणार आहे. १५ नोव्हेंबरला आयुक्त कार्यालयासमोर; तर १७ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलनाची भूमिका घेण्याचा निर्णय ग्रामसेवक संघटनेने घेतला आहे.
आंदोलनाचे चारही टप्पे नगर परिषद निवडणूकीदरम्यानच येत असल्याने ग्रामसेवक निवडणुकीत कितपत सहकार्य करतील, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासह तलाठी आणि मंडळ अधिकार्यांनीही आज एकदिवसीय धरणे आंदोलन करून आपल्या विविध प्रलंबित मागण्या सोडविण्याची गळ प्रशासनाला घातली. त्यांच्याही या भूमिकेमुळे निवडणुकीचे कामकाज बहुतांशी प्रभावित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.