शिरपूरचा विकास खुंटला, लोकप्रतिनिधींची उदासीनता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:27 AM2021-07-01T04:27:49+5:302021-07-01T04:27:49+5:30
गावातील मुख्य रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. सांडपाण्याच्या नाल्या अरूंद असल्याने घाण पाणी रस्त्यावर वाहून समस्या अधिकच गंभीर झाली ...
गावातील मुख्य रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. सांडपाण्याच्या नाल्या अरूंद असल्याने घाण पाणी रस्त्यावर वाहून समस्या अधिकच गंभीर झाली आहे. गावाला मागील दोन वर्षांपूर्वी ‘ब’ श्रेणीतील पर्यटनक्षेत्राचा दर्जा मिळाला. गावाची लोकसंख्या २० हजारांहून अधिक आहे तसेच गावांचा विस्तारही फार मोठ्या प्रमाणात आहे. साहजिकच विकासकामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. सध्याच्या घडीला गावातील सर्वच मुख्य रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. जानगीर महाराज संस्थानकडे जाणारा रस्ता, जगप्रसिद्ध जैन मंदिराकडे जाणारा रस्ता, हजरत मिर्झा बाबा दर्गा तथा जगदंबा देवी संस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यासह वाॅर्ड नंबर ५, वॉर्ड नंबर ६ मधील रस्त्यांची दैना झालेली आहे. गावातील सांडपाण्याच्या नाल्या अतिशय अरुंद झाल्याने तसेच काही ठिकाणी नाल्यांवर अतिक्रमण झाल्याने परिसरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पाणी भरणे झाल्यानंतर नागरिकांकडून रस्त्यावर सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे प्रश्न बिकट झाला आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये मो.ईमदाद बागवान यांनी दाखल केलेली जनहित याचिका निकाली काढताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिरपूर गावातील अतिक्रमण हटवून विकास आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनासह स्थानिक ग्रामपंचायतला दिले होते. यावेळी प्रशासनाने काही रस्त्यावरचे अतिक्रमण हटविले; मात्र, ते आता पूर्ववत झाले आहे. गावात देशभरातून येणाऱ्या भाविकांची व गावकऱ्यांची सोय व्हावी, यासाठी विकासकामांना गती द्यावी, अशी मागणी सर्वच स्तरांतून होत आहे.
..................
विकास आराखडा गुलदस्त्यात
शिरपुरातील अतिक्रमण हटवून विकासकामे करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी दिले होते. प्रशासनाने त्यावर कार्य करण्यास प्रारंभही केला; परंतु पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे विकास आराखडा तयार करण्यात आला की नाही ही बाब गुलदस्त्यात आहे.
....................
कोट:
जैनांची काशी, पर्यटन क्षेत्राचा दर्जा असलेल्या शिरपुरातील मुख्य रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची दुरावस्था झाली आहे. गावाच्या विकासाकरिता अधिक निधी उपलब्ध करून घेणे गरजेचे आहे.
- किशोर देशमुख, शिरपूर जैन
.................
कोट:
गावाचा विस्तार झपाट्याने होत आहे. त्यामुळे विविध स्वरूपातील विकासकामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद होणे आवश्यक आहे. कामे मंजूर झाल्यानंतर ती वेगाने करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन निश्चितपणे पुढाकार घेईन. वाॅर्ड नंबर सहामधील रस्त्याचे १५ व्या वित्त आयोगातून काम सुरू करण्यात आले आहे.
-भागवत भुरकाडे,
ग्रामविकास अधिकारी, शिरपूर