विकासकामाची चौकशी प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:44 AM2021-01-13T05:44:34+5:302021-01-13T05:44:34+5:30
----- कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन कामरगाव : गेल्या काही दिवसांपासून गहू, हरभऱ्यासह ज्वारी आणि मका या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव मोठ्या ...
-----
कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन
कामरगाव : गेल्या काही दिवसांपासून गहू, हरभऱ्यासह ज्वारी आणि मका या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभाग शेताच्या बांधावर पोहोचत आहे. यात कामरगाव आणि शहापूर येथे शुक्रवारी पीक पाहणी करून कृषी पर्यवेक्षक, कृषी साहाय्यकांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
----
धोडप प्रकल्पाची पातळी खालावली
रिसोड : तालुक्यात गत पावसाळ्यात दमदार पाऊस पडल्याने बहुतांश प्रकल्पांच्या पातळीत वाढ झाली नाही. तथापि, भर जहांगिर येथून जवळच असलेल्या धोडप येथील प्रकल्पात पुरेसा साठा झाला नव्हता. त्यात आता सिंचनासाठी उपसा होत असल्याने या प्रकल्पाची पातळी ५० टक्क्यांपर्यंत खालावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनातही अडचणी येण्याची शंका निर्माण झाली आहे.
-------
आरोग्य केंद्र परिसरात स्वच्छता अभियान
पोहरादेवी : मानोरा तालुक्यातील पोहरादेवी आरोग्य केंद्र परिसरात मोठ्या प्रमाणात घाण, कचरा पसरला होता. त्यामुळे डासांचा प्रादुर्भावही वाढल्याने आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांसह रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात आरोग्य केंद्र परिसरात रविवारी स्वच्छता अभियान राबवून झुडपांसह गवत व कचरा साफ करण्यात आला.
------
शेतमजुरांना कौशल्य प्रशिक्षण
मेडशी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोक्रा) अंतर्गत निवडण्यात आलेल्या जिल्ह्यात शेतीशाळेच्या माध्यमातून शेतमजुरांना कीटकनाशक फवारणी, तसेच पीक कापणीबाबत कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. यात मालेगाव तालुक्यातील मेडशी परिसरातील गावांत शुक्रवारी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शेतमजुरांना प्रशिक्षण दिले.