विकास कामे अर्धवट; कंत्राटदारांना ग्रामपंचायतचे अभय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 06:05 PM2020-02-05T18:05:22+5:302020-02-05T18:06:12+5:30
पेव्हरब्लॉक रस्त्याचे काम करताना नाल्या बुजल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहून ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
भर जहॉगिर (वाशिम) : विविध योजनांतर्गत रिसोड तालुक्यातील भर जहॉगिर येथे सुरू करण्यात आलेली विकास कामे दोन वर्षांपासून अर्धवटच आहेत. त्यात स्मशानभूमीसह रस्ता कामाचा समावेश असून, पेव्हरब्लॉक रस्त्याचे काम करताना नाल्या बुजल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहून ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. असे असतानाही ग्रामपंचायत प्रशासन संबंधित कंत्राटदाराला पाठीशी घालत असल्याचे येथे दिसून येत आहे.
भर जहॉगिर ग्रामपंचायत अंतर्गत गेल्या दोन वर्षांपूर्वी काही विकासकामांना मंजुरी मिळाली आणि ती कामेही सुरू करण्यात आली. त्यात मुस्लिम बांधवांसाठी शादिखाना, पशूवैद्यकीय दवाखान्याची डागडुजी व इतर कामे, तसेच गावातील सिमेंट रस्त्यासह स्मशानभूमीसारख्या विविध विकासकामांचा समावेश होता. या कामांमुळे गावकºयांना सुविधाही उपलब्ध होणार होत्या. या कामांसाठी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यानंतर ही कामे सुरू करण्यात आली; परंतु अर्धवट स्थितीतच ही कामे बंद करण्यात आली. आता दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी, यातील बहुतांश कामे अर्धवटच आहेत. त्यात शादिखान्याचे काम, पशू वैद्यकीय दवाखान्यातील फरशीचे काम, स्मशानभुमीच्या कुंपणाचे काम आणि रस्त्याच्या कामाचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही कामे अपूर्ण असतानाच कामांची देयकेही कंत्राटदारांना अदा करण्यात आली. आता ही कामे कोण पूर्ण करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच ग्रामपंचायत प्रशासन संबंधित कंत्राटदारांना कामे पूर्ण करण्याची सुचना देत नसल्याने ग्रामस्थांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी नियमित ग्रामसेवक नसल्याने विकासकामांकडे लक्ष देणार कोण हा प्रश्नही उपस्थित होत आहे.
: ग्रामपंचायत अंतर्गत आपण रुजू होण्यापूर्वी सुरू झालेल्या विकासकामांबाबत आपल्याला काहीच माहिती नाही. पूर्वीच्या ग्रामसेवकांकडे असलेले रेकॉड अद्याप प्राप्त झाले नाही. हे रेकॉर्ड प्राप्त झाल्यानंतरच काही सांगता येईल.
-नंदू भुसारी
ग्रामसचिव, भर जहॉगिर