विकासात्मक कामे खोळंबली; वाकदवासियांचा रास्ता रोको
By संतोष वानखडे | Published: June 26, 2024 06:37 PM2024-06-26T18:37:41+5:302024-06-26T18:37:54+5:30
वाशिम : रिसोड तालुक्यातील वाकद ग्रामपंचायत प्रशासनाने गावात मुलभूत सुविधा न पुरविता घरकुल, सिंचन विहिर यांसह शासकीय लाभांच्या योजनांची ...
वाशिम : रिसोड तालुक्यातील वाकद ग्रामपंचायत प्रशासनाने गावात मुलभूत सुविधा न पुरविता घरकुल, सिंचन विहिर यांसह शासकीय लाभांच्या योजनांची प्रकरणेही अडकवून ठेवल्याचा आरोप करीत, याकडे वरिष्ठांचे लक्ष वेधण्यासाठी २६ जून रोजी वाकद बसथांब्यावर सकाळी १० ते १२ या वेळेत रास्ता रोको आंदोलन केले.
पावसाळ्याचे दिवस असतानाही, वाकद ग्रामपंचायतने गावात स्वच्छतेची कामे केली नाहीत, जलजीवन मिशनच्या कामातही अडथळा निर्माण केल्याने गावकऱ्यांना भर पावसाळ्यातही दूरवरून पाणी आणावे लागत आहे. याशिवाय घरकुल, सिंचन विहिरींच्या फाईलदेखील अडवून ठेवल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. या गंभीर बाबीकडे पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावकरी, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व ग्रामपंचायत उपसरपंचसह आठ सदस्यांनी बुधवारी (दि.२६) वाकद ते मेहकर रस्त्यावर सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत रस्ता रोको आंदोलन केले. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धारही गावकऱ्यांनी केला. दरम्यान, पंचायत समितीच्या चमूने आंदोलनस्थळी भेट देवून ग्रामपंचायत स्तरावर पारित झालेले ठराव पंचायत समितीकडे पाठवा, त्यावर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करू तसेच गावातील घाणीचे साम्राज्य दूर सारून स्वच्छता अभियान राबवू, असे आश्वासन गावकऱ्यांना दिले. रास्ता रोको आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, ग्रामपंचायत उपसरपंचासह ८ सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाच्यावेळी रिसोड पोलीस स्टेशनच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवला होता.
पिण्यासाठी पाणी द्या हो...!
वाकद गावातील जलजीवन मिशन योजनेचे काम बंद असल्याने गावकऱ्यांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. या योजनेचे काम त्वरित सुरू करून गावकऱ्यांना पाणी पुरविण्याच्या मागणीसाठी महिलांनीसुद्धा हंडे घेऊन या रास्ता रोको आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदविला.