वाकद येथे विकास कामे ठप्प; ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 03:06 PM2019-01-17T15:06:41+5:302019-01-17T15:09:20+5:30
गावातील अतिक्रमण, ठप्प असलेली विकास कामे आदींना कंटाळून तालुक्यातील वाकद येथील ग्रामस्थांनी १७ जानेवारीला सकाळी १० वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.
रिसोड (वाशिम) : गावातील अतिक्रमण, ठप्प असलेली विकास कामे आदींना कंटाळून तालुक्यातील वाकद येथील ग्रामस्थांनी १७ जानेवारीला सकाळी १० वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. यावेळी ग्राम पंचायत प्रशासनाच्या दिरंगाई धोरणाबद्दल रोष व्यक्त केला.
वाकद ग्रामपंचायतने महिलांसाठी सार्वजनिक शौचालय बांधले होते. परंतू या शौचालयाच्या बाजूला कुणीतरी अतिक्रमण करून शौचालयाकडे जाण्यासाठी रस्ताच ठेवला नाही. यासंदर्भात महिलांसह ग्रामस्थांनी अनेकवेळा ही बाब ग्राम पंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणुन दिली. मात्र, याकडे ग्राम पंचायतने लक्ष दिले नाही. याशिवाय गावातील विकास कामे ठप्प आहेत असा आरोप करीत गावक-यांनी १७ जानेवारीला ग्राम पंचायत कार्यालयाला कुलुप ठोकले. जोपर्यंत प्रलंबित प्रश्न सोडविले जात नाहीत, तोपर्यत आम्ही ग्राम पंचायत कार्यालय उघडू देणार नाही, अशी भूमिका महिलांसह ग्रामस्थांनी घेतली होती. शेवटी ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी येवुन महिलांची तसेच ग्रामस्थांची समजुत काढत सदर अतिक्रमण तातडीने काढले जाईल, अशी ग्वाही दिली. त्यामुळे कुलूप ठोको आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलन मागे घेतल्यानंतर ग्राम पंचायत प्रशासनाने घटनास्थळावर जावून अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही केली.