श्रींच्या पालखी दर्शनाला सलग दुसऱ्यावर्षीही भाविक मुकणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:53 AM2021-06-16T04:53:37+5:302021-06-16T04:53:37+5:30
विदर्भ पंढरी शेगावीचा राणा संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचा शेकडो भगवा पताकाधारी वारकऱ्यांनी समाविष्ट पायदळ पालखी सोहळा आषाढी वारीसाठी ...
विदर्भ पंढरी शेगावीचा राणा संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचा शेकडो भगवा पताकाधारी वारकऱ्यांनी समाविष्ट पायदळ पालखी सोहळा आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जात असतो. गण गणात बोते, विठू नामाचा गजर करीत पालखी पंढरपूरच्या दिशेने जून महिन्यात मार्गस्थ होत असते. मागील दोन वर्षांत कोरोनाचे संकट असल्यामुळे मार्च २०२० पासून सर्वच प्रकारच्या मोठ्या कार्यक्रम, सोहळ्यास मनाई करण्यात आली. मागीलवर्षी व यावर्षी अशा सलग दोनवेळा श्रींचा पालखी सोहळा पूर्वीप्रमाणे काढण्यात आला नाही. यावर्षी राज्य शासनाने मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत एसटी बसमधून जाण्याच्या अटीवर राज्यातील केवळ १० देवस्थानच्या आषाढीवारीला परवानगी दिली आहे. यामध्ये शेगावचा संत गजानन महाराज संस्थानचा समावेश नाही. आषाढीवारीला जाणाऱ्या संत गजानन महाराजांच्या पालखीचा शिरपूर येथे एकदिवसीय मुक्काम असतो. श्रींचा पालखी सोहळा पाहण्यासाठी, दर्शनासाठी तथा स्वागतासाठी शिरपूरसह परिसरातील हजारो भक्तगण आतुर असतात. विविध राजकीय, सामाजिक संघटना, शासकीय कर्मचारी श्रींच्या पालखीत सहभागी वारकऱ्यांसाठी विविध ठिकाणी अल्पोपाहार, भोजन, शीतपेय वितरण करीत असतात. पालखी सोहळ्यामुळे शिरपूरला यात्रेचे स्वरूप प्राप्त होत असे. मात्र सलग दुसऱ्या वर्षीही श्रींचा भव्य पालखी सोहळा रद्द झाल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
-------------------
पालखी साेहळ्यास परवानगी देण्याची अपेक्षा
सलग दुसऱ्यावर्षी श्रींच्या पालखी दर्शनाला मुकावे लागत आहे. हळूहळू परिस्थिती अनलॉक होत असताना, सरकारने काही अटी, शर्तीवर आषाढीवारीच्या पालखी सोहळ्यास परवानगी द्यायला हवी होती, अशी अपेक्षा भाविकांकडून व्यक्त केली जात आहे. श्री क्षेत्र डव्हा, शिरपूर, मसलापेन या ३० किलोमीटरमध्ये श्रींचा पालखीचा प्रत्येकी एका रात्रीचा मुक्काम असतो. त्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण असते.