१ मार्चला होणार जंतनाशक गोळ्यांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:55 AM2021-02-27T04:55:26+5:302021-02-27T04:55:26+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात झालेल्या या सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात झालेल्या या सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी म्हणाले, जंतनाशक गोळी वाटपाची मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभाग, अंगणवाडी, एकात्मिक महिला व बालविकास विभाग यांनी परस्पर समन्वय ठेवावा. तसेच याबाबत सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण द्यावे.
डॉ. आहेर म्हणाले, एक ते १९ वर्षे वयोगटातील किमान ६८ टक्के बालकांमध्ये आढळणारा आतड्याचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतुंमुळे होतो. हाच कृमीदोष रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण ठरतो. तसेच यामुळे बालकाची बौद्धिक व शारीरिक वाढही खुंटते. त्यामुळे त्यांना जंतनाशक गोळी दिली जात आहे. कोरोना संसर्गामुळे अंगणवाडी, शाळा बंद असल्याने सर्व मुला-मुलींना अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांच्यामार्फत १ मार्च रोजी जंतनाशक गोळी घरपोच देण्यात येणार आहे. १ ते २ वर्षे वयोगटातील बालकांना अर्धी गोळी पावडर करून देण्यात येईल, तसेच २ वर्षे ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना एक गोळी चावून खाण्यासाठी देण्यात येणार आहे. या गोळीचा कोणताही दुष्परिणाम (साईड इफेक्ट) होणार नाही. त्यामुळे याबाबत कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नाही.
...................
बॉक्स :
जिल्ह्याला मिळाल्या ६ लाख गोळ्या
जिल्ह्यातील सुमारे ३ लक्ष ३९ हजार ३८३ मुला-मुलींना जंतनाशक गोळीचे वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी जिल्ह्याला ६ लाख गोळ्या प्राप्त झाल्या असून त्याचे तालुकानिहाय वितरण करण्यात आले आहे. १ मार्च रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन झाल्यानंतर यादिवशी ज्यांना गोळ्यांचे वाटप झालेले नाही, अशा मुलांना ८ मार्च रोजी मॉपअप दिनी जंतनाशक गोळीचे वाटप करण्यात येणार असल्याचे डॉ. आहेर यांनी सांगितले.