वाशिम जिल्ह्यात ग्रामसेवकांचे धरणे; गावपातळीवरील कामकाज ठप्प !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 02:33 PM2019-08-09T14:33:05+5:302019-08-09T14:35:04+5:30
वाशिम जिल्ह्यात सहाही पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामसेवकांनी धरणे आंदोलन केले.
वाशिम : विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेने ९ आॅगस्टला राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली असून, वाशिम जिल्ह्यात सहाही पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामसेवकांनी धरणे आंदोलन केले. यामुळे गावपातळीवरील कामकाज एका दिवसापुरते ठप्प झाले.
ग्रामसेवकांची पदोन्नती प्रक्रिया निकाली काढावी, कंत्राटी ग्रामसेवकांची सुरक्षा ठेव परत करावी, परिभाषित अंशदायी निवृत्त वेतन योजनेंतर्गत (डीसीपीएस) कपातीच्या पावत्या ग्रामसेवकांना द्याव्या, ग्रामसेवक संवर्गाच्या वैद्यकीय देयकांची परिपूर्तता करावी, निलंबित केलेल्या ग्रामसेवकांना ९० दिवसांपेक्षा जास्त दिवस झाल्यामुळे त्यांना त्वरीत सेवेत घेण्यात यावे यासह अन्य मागण्या प्रलंबित आहेत. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना विविध टप्प्यात आंदोलन करणार असून, ९ आॅगस्ट या क्रांतीदिनापासून आंदोलनाला सुरूवात केली. जिल्ह्यातील सहाही पंचायत समिती कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. सर्व ग्रामसेवक या आंदोलनात सहभागी असल्याने शुक्रवारी गावपातळीवर कामकाज ठप्प पडले. १३ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन, त्यानंतर १६ आॅगस्ट रोजी विभागीय कार्यालयावर धरणे आंदोलन, १८ आॅगस्ट रोजी पालकमंत्र्यांच्या घरासमोर धरणे व निवेदन दिले आणि २२ आॅगस्टपासून सर्व ग्रामसेवक काम बंद आंदोलन करून ग्राम पंचायतच्या चाव्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्या ताब्यात देतील, असे आंदोलनाचे स्वरुप आहे. ९ आॅगस्ट रोजीच्या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील १०० टक्के कर्मचारी सहभागी होते, असा दावा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आत्माराम नवघरे व जिल्हा सचिव अरूण इंगळे यांनी केला.