वाशिम जिल्ह्यात २८ मे पासून अतिसार नियंत्रण पंधरवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:57 PM2019-05-21T12:57:57+5:302019-05-21T12:58:12+5:30
वाशिम : भारत सरकारच्या निर्देशानुसार २८ मे ते ९ जून २०१९ या कालावधीत अतिसार नियंत्रण पंधरवडा जिल्ह्यामध्ये राबविला जाणार.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : भारत सरकारच्या निर्देशानुसार २८ मे ते ९ जून २०१९ या कालावधीत अतिसार नियंत्रण पंधरवडा जिल्ह्यामध्ये राबविला जाणार असून, त्या अनुषंगाने संबंधित विभागांनी समन्वयातून विविध उपक्रम, कार्यक्रम राबविण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिल्या.
आरोग्य विभाग आणि युनिसेफच्यावतीने स्थानिक नियोजन भवनात आयोजित दोन दिवशीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी न्यूमोनिया, डायरिया या आजारापासून सावध राहण्यासाठी नेमके काय करावे याची माहिती देण्यात आली. तसेच आगामी अतिसार नियंत्रण पंधरवडा, पूर्वनियोजन, विविध उपक्रम आदींची माहितीदेखील यावेळी देण्यात आली. शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्वाधिक बालमृत्यू हे न्युमोनिया व डायरिया या दोन आजारामुळे होतात. यावर प्रतिबंध घालण्यासाठी आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण, ग्रामीण पाणीपुरवठा तसेच पाणी व स्वच्छता विभागाने मिळून एकात्मिक पद्धतीने प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशा सूचना दीपक कुमार मीना यांनी दिल्या. २८ मे ते ९ जून २०१९ या कालावधीत जिल्ह्यात अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येणार आहे. याचे पूर्वनियोजन करणे, विविध विभागाने सक्रिय सहभाग घेणे तसेच पुढील दोन महिन्यामध्ये एक पथदर्शी कार्यक्रम तयार करून पुढील दोन वर्षामध्ये न्यूमोनिया व डायरिया या आजाराच्या निर्देशांकमध्ये सुधारणा करण्याचे निर्देशही मीना यांनी दिले आहेत. यावेळी शुन्य ते पाच या वयोगटातील मुलांच्या आरोग्यासाठी सर्वाधिक घातक असलेल्या न्युमोनिया (श्वसनदाह) आणि डायरिया (हगवण) या आजारांवर प्रतिबंध घालण्यासंदर्भात एकात्मिक पध्दतीने प्रयत्न केले जातील, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे, महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितिन मोहुर्ले, युनिसेफचे आरोग्य अधिकारी डॉ. मंगेश गढरी, डॉ. वैभव महात्मे आदिंची यावेळी उपस्थिती होती.