रब्बी पेरणीची तयारी करताय, कर्जासाठी प्रस्ताव दिला का?
By दिनेश पठाडे | Published: October 3, 2023 05:10 PM2023-10-03T17:10:49+5:302023-10-03T17:11:07+5:30
रब्बी हंगामात १४ हजार शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट
वाशिम : जिल्ह्यात खरीप हंगामात उडीद, मूग, अल्पावधीत येणारे सोयाबीन घेतलेल्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. बी - बियाण्याची जमवाजमव केली जात आहे. पेरणीसाठी अनेक शेतकऱ्यांना आर्थिक चणचण भासते, अशावेळी बँकेकडे अर्ज करून पीककर्ज घेणे शक्य आहे. काही दिवसांत सर्वच ठिकाणी सोयाबीन काढणीस प्रारंभ होईल. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे पीक उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. शिवाय बाजार समितीत आवक वाढल्यानंतर भावदेखील कमी होतात. अशावेळी शेतकरी सोयाबीन न विकता ठेवून देतात.
रब्बी हंगामासाठी उसनवारी करून किंवा उधारीने बी-बियाणे घेतात. काहीजण खासगी सावकाराकडून कर्ज घेतात. यामुळे अनेकांना आर्थिक भुर्दंड बसतो. या परिस्थितीत शेतकऱ्यांना पीककर्ज घेण्याचा मार्ग हिताचा ठरतो. यंदाच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्यानुसार जिल्ह्याला रब्बी हंगामात १५५ कोटी २१ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून, ज्याचा लाभ १३ हजार ९९० शेतकऱ्यांना होणे अपेक्षित आहे. खरीप हंगामातील पीककर्ज वाटपाचा कालावधी ३० सप्टेंबरला संपुष्टात आला आहे.
१ ऑक्टोबरपासून रब्बी हंगामाचे पीककर्ज वाटपास प्रारंभ झाला आहे. त्या-त्या बँकेला कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. खरीप हंगामाच्या तुलनेत रब्बी हंगामात पेरणीचे क्षेत्र कमी असते. त्यामुळे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्टदेखील कमी राहत असल्याचे चित्र आहे. यंदा खरीप हंगामात विक्रमी कर्जवाटप झाले आहे. त्याचप्रमाणे रब्बी हंगामातही सुरुवातीच्या कालावधीपासूनच पीककर्ज वाटप गतीने करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी बँकांना दिल्या आहेत.
गतवर्षी होते १२६ कोटींचे उद्दिष्ट
रब्बी हंगाम २०२२-२३ मध्ये जिल्ह्याला १० हजार शेतकऱ्यांना १२६ कोटी रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या वर्षात बऱ्यापैकी कर्जवाटप करण्यात आले. खरीप हंगामात काही कारणास्तव कर्ज घेता आले नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पीककर्ज घेतले होते.