‘फ्ल्यू’ लसीच्या किमतीत तफावत; पालक संभ्रमात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:27 AM2021-06-22T04:27:05+5:302021-06-22T04:27:05+5:30

रिअ‍ॅलिटी चेक संतोष वानखडे वाशिम : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना अधिक धोका असण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने बालकांना ‘फ्ल्यू’ची ...

The difference in the price of the ‘flu’ vaccine; Parents in confusion! | ‘फ्ल्यू’ लसीच्या किमतीत तफावत; पालक संभ्रमात !

‘फ्ल्यू’ लसीच्या किमतीत तफावत; पालक संभ्रमात !

Next

रिअ‍ॅलिटी चेक

संतोष वानखडे

वाशिम : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना अधिक धोका असण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने बालकांना ‘फ्ल्यू’ची लस देण्याकडे काही पालकांचा कल दिसून येतो, तर काही पालक बिनधास्त आहेत. दरम्यान, रुग्णालय बदलेल तशी ‘फ्ल्यू’ लसीची किंमतही बदलत असल्यामुळे पालकांमध्ये संभ्रम आहे. या लसीची मूळ किंमत नेमकी किती, असा प्रश्न पालकांमधून उपस्थित केला जात आहे.

देशात मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. पहिल्या लाटेत १८ तसेच १० वर्षांआतील मुलांना फारसा कोरोना संसर्ग झाला नाही. दुसऱ्या लाटेत मात्र १८ वर्षांआतील मुलांनादेखील कोरोना संसर्ग झाला. दुसरी लाट ओसरत असल्याने जिल्हावासीयांसाठी ही बाब दिलासादायक ठरत आहे, तर दुसरीकडे तिसऱ्या लाटेचा अंदाजही तज्ज्ञांकडून वर्तविला जात असल्याने, थोडी धाकधूकही कायम आहे. तिसऱ्या लाटेत १८ वर्षांआतील मुलांना अधिक धोका असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्यात बालरोगतज्ज्ञांचा ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्यात आला. कोरोनापासून बालकांचा बचाव म्हणून इन्फ्लुएन्झा लस देण्यात यावी, असा सल्ला महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्स व पीडियाट्रिक टास्क फोर्सने दिलेला आहे. कंपनीनुसार या लसीच्या किमतीही वेगवेगळ्या आहेत. ही लस दोन प्रकारची असून, एका लसीची किंमत १२००, तर दुसऱ्या लसीची किंमत १८०० रुपये अशी आहे. मात्र या किमती जिल्ह्यातील सर्वच रुग्णालयांत समान नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीतून समोर आले. किमती समान नसल्याने पालकांमध्येही संभ्रम आहे. हा संभ्रम दूर होण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात लसीची किंमत समान असावी, म्हणून दरपत्रक लावण्यात यावे, असा सूर पालकांमधून उमटत आहे.

०००००००

एका रुग्णालयात १८००, तर दुसऱ्या रुग्णालयात २००० रुपये किंमत

बॉक्स

१) इन्फ्लुएन्झा लस ही दोन प्रकारे असून, वाशिम येथील एका रुग्णालयात पहिल्या लसीची किंमत १२०० रुपये, तर दुसऱ्या लसीची किंमत १८०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. पालकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले.

२) वाशिम येथील एका रुग्णालयात पहिल्या लसीची किंमत १४०० रुपये, तर दुसऱ्या लसीची किंमत १८०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. बालकांना लस देण्याबाबत पालकांचा प्रतिसाद संमिश्र असल्याचे सांगण्यात आले.

३) वाशिम येथील एका रुग्णालयात विचारणा केली असता, एका लसीची किंमत १८००, तर दुसऱ्या लसीची किंमत २००० रुपये असल्याचे सांगण्यात आले. सुशिक्षित, नोकरदार वर्गातील पालकांचा प्रतिसाद बऱ्यापैकी असल्याचे दिसून आले.

४) वाशिम शहरातील एका रुग्णालयात २०२० मधील लस ही १२०० रुपये, तर २०२१ मधील लसीची किंमत १८५० रुपये असल्याचे सांगण्यात आले. पालकांचा प्रतिसाद मात्र अल्प प्रमाणात मिळत असल्याचे सांगितले.

००००००००००००००

० ते ६ वर्षाआतील बालकांची संख्या - १५२१९०

मुले - ८१६८६

मुली - ७०५०४

.........................

बॉक्स..

निरोगी आरोग्यासाठी नियमित लसीकरण !

वयाच्या १४ व्या वर्षांपर्यंत बालकांचे विविध प्रकारे लसीकरण केले जाते. जिल्हा सामान्य रुग्णालयात वयाच्या साडेपाच वर्षापर्यंत बालकांना वयोगटानुसार मोफत लसीकरण केले जाते. मुलांना इन्फ्लुएन्झा लस देण्याचा सल्ला टास्क फोर्सने दिला आहे. ही लस खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. बालकांची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहावी याकरिता लसीकरण महत्त्वाचे आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्यापूर्वी बालकांना आवश्यक असलेल्या लसी वेळेतच देण्यात याव्यात, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला.

०००००

कोट बॉक्स

बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे, रोगप्रतिकारशक्ती चांगली राहावी याकरिता लसीकरण महत्त्वाचे आहे. कंपनीनुसार ‘फ्ल्यू’ लसीच्या किमती बदलतात. एकाच कंपनीची विशिष्ट लस समान किमतीत सर्वत्र उपलब्ध व्हावी. याबाबत माहिती घेऊन संबंधितांना सूचना दिल्या जातील.

- डॉ. मधुकर राठोड,

जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम.

०००००

Web Title: The difference in the price of the ‘flu’ vaccine; Parents in confusion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.