पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकड्यात तफावत; नागरिक चिंतेत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:43 AM2021-05-27T04:43:11+5:302021-05-27T04:43:11+5:30
शंकर वाघ शिरपूर जैन : शिरपूर जैन येथे १८ मे रोजी करण्यात आलेल्या चाचणीमधील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत तालुका आरोग्य ...
शंकर वाघ
शिरपूर जैन : शिरपूर जैन येथे १८ मे रोजी करण्यात आलेल्या चाचणीमधील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत तालुका आरोग्य अधिकारी व आरोग्यवर्धिनी केंद्रातील माहितीमध्ये तफावत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आरोग्य विभागातील आकड्यांच्या या खेळात सर्वसामान्यांचाच ‘खेळ’ होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मे महिन्यात ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने शासनासह प्रशासनही अलर्ट झाले आहे. ग्रामीण भागात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत असून, याला नागरिकांचा प्रतिसादही मिळत आहे. १८ मे रोजी शिरपूर आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये एकूण ४९ नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. चाचणी करण्यात आलेल्या एकूण ४९ नागरिकांपैकी २३ नागरिक हे शिरपूर जैन येथील रहिवासी आहेत. त्यापैकी सात जण पॉझिटिव्ह असल्याची माहिती शिरपूर आरोग्यवर्धिनी केंद्रातून देण्यात आली. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांतर्फे बालू गवई यांनी दिलेल्या माहितीनुसार ४९ चाचण्यांपैकी चार जण पॉझिटिव्ह आले. शिरपूर आरोग्यवर्धिनी केंद्र व मालेगाव तालुका आरोग्य अधिकारी यांच्या वतीने दिलेल्या माहितीत तफावत असल्याचे समोर आले. १८ मे रोजी शिरपूर येथे नेमके किती जण पॉझिटिव्ह आले? असा प्रश्न निर्माण होत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकड्यातील ही तफावत नागरिकांची चिंता वाढविणारी ठरत आहे. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष बोरसे यांच्याशी संपर्क साधला असता, फोनवर बोलता येणार नाही, प्रत्यक्ष भेटून सांगता येईल, असे त्यांनी सांगितले.
०००
कोट बॉक्स
शिरपूर स्थानिक व संपूर्ण केंद्रांतर्गत कोरोना चाचणीमध्ये तारखेच्या घोळामुळे थोडा फरक असू शकतो. याविषयी फोनवर बोलता येणार नाही. प्रत्यक्ष भेटून सांगता येईल.
- डॉ. संतोष बोरसे,
तालुका आरोग्य अधिकारी, मालेगाव