शेततळ्याच्या आधारे पिकविली टरबुजे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2018 04:48 PM2018-03-17T16:48:17+5:302018-03-17T16:48:17+5:30
आदर्श शेती: मंगरुळपीर तालुक्यातील प्रगतशील शेतक-याचा उपक्रम
वाशिम : गतवर्षी जिल्ह्यात अपुरा पाऊस पडल्यानंतरही शेततळ्याच्या आधारे टरबुजाचे भरघोस उत्पादन घेण्याची किमया मंगरुळपीर तालुक्यातील मंगळसा येथील शेतकरी डिगांबर गिरी यांनी केली आहे. डिगांबर गिरी यांच्याकडे वडिलोपार्जित असलेली २० एकराहून अधिक शेती आहे. या शेतीत विविध प्रयोग करून ते भरघोस उत्पादन घेतात. डाळिंब, पपई, काकडी आदि पिकांसह भाजीपाल्यावर त्यांचा अधिक भर आहे. गेल्या काही वर्षांपासून ते आपल्या शेतीत टरबुजाचे उत्पादनही घेत आहेत. दरम्यान, यंदाही त्यांनी आपल्या एकूण शेतजमिनीपैकी दोन एकर क्षेत्रावर मल्चिंग पद्धतीने टरबुजाची लागवड केली आहे.
मंगरुळपीर तालुक्यात गतवर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ७४ टक्के पाऊस पडला. त्यामुळे तालुक्यातील जलस्त्रोत आटले असून, भूजल पातळीतही मोठी घट झाली आहे. यामुळे अनेक फलोत्पादक शेतक-यांना फटकाही बसला; परंतु डिगांबर गिरी यांची कल्पकता यशस्वी ठरली. त्यांनी आपल्या शेतीत भव्य असे शेततळे खोदले असून, पावसाच्या पाण्यासह शेतातील विहिरीचे पाणी त्यांनी या शेततळ्यात सोडून ते पावसाळ्यातच भरून घेतले आता. याच शेततळ्यातील पाण्याचा प्रभावी वापर करून त्यांनी दोन एकरात टरबुजाचे भरघोस उत्पादन घेतले आहे. तथापि, कमी दर असल्याने त्यांना अपेक्षीत उत्पन्न मिळू शकले नाही.