रस्त्याच्या दोन्ही बाजुने एकाच वेळी खोदकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 02:40 PM2019-07-14T14:40:47+5:302019-07-14T14:40:53+5:30
बांधकामाच्या ठिकाणी माहितीदर्शक फलकाचा अभाव : मुरूमही टाकला नाही लोकमत न्यूज नेटवर्क पांडवउमरा ( वाशिम ) : वाशिम ते ...
बांधकामाच्या ठिकाणी माहितीदर्शक फलकाचा अभाव : मुरूमही टाकला नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
पांडवउमरा (वाशिम) : वाशिम ते शेलुबाजार दरम्यान रस्ता नुतनीकरणाचे काम सुरू आहे. एकाच वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूचे खोदकाम करण्यात येत असल्याने वाहनांना बाजू देताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुने खोदकाम केल्याने अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाशिम ते शेलुबाजार दरम्यान रस्ता रूंदीकरण सुरू आहे. पांडवउमरा ते वाशिम यादरम्यान दोन्ही बाजूने खोदकाम केले आहे. तीन लाख रुपयापेक्षा अधिक बांधकाम होत असलेल्या ठिकाणी माहितीदर्शक फलक लावणे आवश्यक आहे. सदर काम कोणत्या योजनेंतर्गत सुरू आहे, एकूण निधी, काम पूर्ण होण्याचा कालावधी व कंत्राटदाराचे नाव या फलकावर नमूद असणे आवश्यक आहे. या ठिकाणी असा माहितीदर्शक फलक आढळून येत नाही. रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे याकरीता या मार्गावरून अवजड वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. तथापि, अवजड वाहतूक सुरू असल्याचे दिसून येते. रस्त्याच्या दोन्ही बाजुने खोदकाम करुन त्यामध्ये काही ठिकाणी मातीमिश्रीत मुरुमाचा वापर केला तर तांदळी शेवई ते वाशिम या दरम्यान काही ठिकाणी मुरूमच टाकण्यात आला नाही. याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
खोदकाम केलेल्या ठिकाणी लवकरच मुरुम टाकुन दबाई केली जाईल. वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.
- आर.डी.लुंगे
उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, वाशिम
वाशिम ते शेलुबाजार मार्गावर बºयाच ठिकाणी दोन्ही बाजुने खोदकाम करुन ठेवले. पण खोदलेल्या ठिकाणी मुरुम टाकला नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
- बबन नरवाडे,
सामाजिक कार्यकर्ते, पांडवउमरा