२० दिवसांत ९०६ टन भाजीपाला, फळांची ग्राहकांना थेट विक्री!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 04:49 PM2020-04-19T16:49:16+5:302020-04-19T16:49:31+5:30
२.२६ कोटींची उलाढाल झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी ‘लॉक डाऊन’ कालावधीत नागरिकांना दुध, भाजीपाला, फळे उपलब्ध व्हावी, यासाठी कृषी विभागाने शेतकरी गटांमार्फत उत्पादित शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहचिला. यामाध्यमातून गत २० दिवसांत ९०६ टन भाजीपाला व फळांची विक्री झाली असून २.२६ कोटींची उलाढाल झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली.
शेतकरी, शेतकरी गट तसेच शेतकरी कंपन्यांमार्फत उत्पादित शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापण करण्यात आले आहे. कृषी उपसंचालक निलेश ठोंबरे, तंत्र अधिकारी (विस्तार) समाधान पडघान, मनिषा लंगोटे (फलोत्पादन) यांची जिल्हास्तरावर नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. यासह तालुका स्तरावर कृषी अधिकारी व कृषी सहायकांची तालुका नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली.
दरम्यान, जिल्ह्यात शहरी भागात एकाच ठिकाणी भाजी मंडई होती. ‘लॉक डाऊन’नंतर जिल्हा क्रीडा संकुल, काटा रोड मैदान, जुनी जिल्हा परिषद परिसर, गुरूवार बाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती, वत्सगुल्म मराठी शाळा, जुने आरटीओ कार्यालय आदी ठिकाणी जागेची आखणी करुन भाजी मंडईचे नियोजन करण्यात आले. त्यास वाशिम शहरातील नागरिकांनी ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करित उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
खबरदारीची उपाययोजना म्हणून भाजीपाला, फळे व दूध विक्रेत्यांना कृषी विभागाकडून रियुजेबल कापडी मास्कचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव, मानोरा, मंगरूळपीर, कारंजा येथेही शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्रीचा उपक्रम राबविण्यात आला. २७ मार्चपासून १६ एप्रिलपर्यंत याअंतर्गत तब्बल ५०६ टन भाजीपाला आणि फळांची विक्री झाली असून २.२६ कोटींची उलाढाल झाल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तोटावार यांनी सांगितले.