गाळ, कचऱ्याने रोडावले पूस नदीचे पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 04:05 PM2019-05-04T16:05:51+5:302019-05-04T16:08:16+5:30
वाशिम: जिल्ह्यातील मोठ्या नद्यांपैकी एक असलेल्या पूस नदीचे पात्र गाळ, कचऱ्यासह झुडपांमुळे रोडावले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यातील मोठ्या नद्यांपैकी एक असलेल्या पूस नदीचे पात्र गाळ, कचऱ्यासह झुडपांमुळे रोडावले आहे. परिणामी या नदीचे पात्र पावसाळ्यानंतरच कोरडे पडू लागते. सद्यस्थितीत या नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडले आहे. या नदीवर अवलंबून असलेल्या गावांतून नदीचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
वाशिम जिल्ह्यातून वाहणाºया प्रमुख नद्यांमध्ये अरुणावती, काटेपूर्णा, कास नदी, चंद्रभागा,पैनगंगा आणि बेंबळा नदीसह पूस नदीचा समावेश आहे. पूस नदी ही पैनगंगा या नदीची उपनदी आहे. ही नदी वाशिम जिल्ह्यात उगम पावते. पुढे ही नदी यवतमाळ जिल्ह्यातील माहूरजवळ हिवरा संगम येथे पैनगंगेला जाऊन मिळते. या नदीवर अलिकडेच वाशिम जिल्ह्यातील वारा जहॉगिर येथे सिंचन प्रकल्पाची उभारणी करण्यात आली असून, या प्रकल्पाद्वारे शेकडो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. तथापि, या नदीचे अस्तित्व टिकविण्यासाठी फारसे प्रयत्न प्रशासकीय स्तरावर होत असल्याचे दिसत नाही. कधीकाळी खळखळ वाहणाºया नदीचे पात्र आता गाळ, कचऱ्यासह झुडपांमुळे रोडावल्याने ती हिवाळ्यापासूनच कोरडी पडू लागते. त्यामुळे जिल्ह्यात या नदीच्या काठावर वसलेल्या शेकडो गावांना या नदीचा फायदा होत नाही. गुरांच्या पाण्यासाठी आधार ठरणारे नदीपात्र आता पूर्णपणे कोरडे पडले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथून वाहणाºया पूस नदीला गेल्या काही वर्षांत साचलेला कचरा, गाळ यामुळे डबक्याचे स्वरूप आले होते. याची दखल घेत नाम फाउंडेशन व पूस नदी पुनरुज्जीवन अभियान समितीतर्फे 'पूस नदी पुनरुज्जीवन अभियान' राबविण्यात आले. या अभियानाला पुसद येथील नागरिक व सामाजिक संस्थांनी उत्साहाने सहकार्य केल्याचा फायदा यंदा दिसून आला. असेच प्रयत्न वाशिम जिल्ह्यातही होण्याची गरज निर्माण झाली आहे.