नियोजनाअभावी राज्यस्तरीय स्पर्धेच्या खेळाडूंची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 11:13 PM2017-10-12T23:13:40+5:302017-10-12T23:17:02+5:30
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणेअंतर्गत वाशिम जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंना जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या नियोजनाअभावी मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणेअंतर्गत वाशिम जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंना जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या नियोजनाअभावी मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणेअंतर्गत वाशिम जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १५ आॅक्टोबर या कालावधीत राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी ५ वाजता होणार होते; परंतु पावसामुळे ते होऊ शकले नाही. दरम्यान, या स्पर्धेसाठी लातूर, हिंगोली, औरंगाबाद, यवतमाळ, उस्मानाबादसह अनेक जिलह्यातील खेळाडू वाशिम येथे बुधवारीच दाखल झाले. असून, या राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये १४ वर्षे, १७ वर्षे व १९ वर्षे वयोगटातील मुली व मुलांचे ८ विभागाचे व क्रीडा प्रबोधनी यांचा प्रत्येकी एक संघ असे एकूण ५४ संघ सहभागी होणार आहेत.
प्रत्येक संघात १२ खेळाडूंचा समावेश असून त्यांच्यासोबत एक संघ व्यवस्थापक आसले आहेत. आता या खेळाडूंच्या संघांसह सोबत आलेल्या सर्व चमुच्या राहण्यासह जेवणाची व्यवस्था क्रीडा संकुलात किंवा इतर ठिकाणी करणे अपेक्षीत होते; परंतु त्याची थोडही काळजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून घेण्यात आली नाही. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी झालेल्या एकाही खेळाडूंना जेवणच काय, तर सकाळचा उपाहारही मिळू शकला नाही. दिवसभर हे सर्व चिमुकले खेळाडू भुकेने व्याकूळ होत असतानाही त्याची दखल प्रशासनाकडून घेण्यात येत नसल्याने या खेळाडूंनी अखेर जिल्हाधिकाºयांकडे धाव घेण्याचेही ठरविले. राज्यस्तरीय स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयासह संबंधित यंत्रणेकडून सर्वच बाजूंचा विचार करून योग्य नियोजन करण्यासह खेळाडूंच्या सोयीची काळजी घेणे अपेक्षीत असताना त्याचा पूर्ण अभाव वाशिम येथे पाहायला मिळाला. परिणामी खेळाडूंची मोठ्या प्रमाणात गैरसोय झालीच शिवाय वाशिमच्या नावालाही गालबोट लागले. रात्री उशिरा १० वाजताच्या सुमारास या खेळाडूंना दिवसाचे पहिले जेवण मिळाल्याचे या संदर्भात माहिती घेतल्यानंतर सांगण्यात आले.