विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:35 AM2021-02-08T04:35:19+5:302021-02-08T04:35:19+5:30
मंगरुळपीर तालुक्यातील आदर्शग्राम वनोजा येथे श्रीमती साळुंकाबाई राऊत महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन विषयावर शुक्रवारी ६ फेब्रुवारी रोजी व्याख्यानाचे ...
मंगरुळपीर तालुक्यातील आदर्शग्राम वनोजा येथे श्रीमती साळुंकाबाई राऊत महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन विषयावर शुक्रवारी ६ फेब्रुवारी रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले, तसेच विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य देवेंद्र गावंडे, तर प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत उपस्थित होते.
वैराग्यमूर्ती राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय, आपत्ती व्यवस्थापनाचे प्रकार याबाबत शाहू भगत यांनी माहिती दिली. त्यात नैसर्गिक आपत्तीमध्ये महापूर, भूकंप, त्सुनामी, अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ, वीज याबाबत संकटाशी कसा सामना करावा, संकटातून जीव वाचवण्यासाठी कसा प्रयत्न करावा, काय करावे काय करू नये, यामध्ये कोणा कोणाची मदत व सहकार्य घ्यावे. महापुराच्या वेळी गावांनी कशी खबरदारी घ्यावी, आदींबाबत माहिती देतानाच मानवनिर्मित आपत्तीमध्ये आग, बॉम्बस्फोट, रस्ता अपघात, दहशतवाद, जातीय दंगे, सर्पदंश, कुत्रा चावणे आदी आपत्तीदरम्यान कोणत्या उपाययोजना कराव्या, स्वत:सह इतरांचा जीव कसा वाचवावा, याबाबतही भगत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डोंगरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांसह प्रा. बापुराव डोंगरे, सचिन राणे यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. ममता पाथ्रीकर, प्रा. भगत, प्रा. घोंगटे, प्रा. मुंदे, प्रा. पाथ्रीकर, प्रा. लहासे, प्रा. भगत व विद्यार्थी व इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.