१५२ गावांच्या सुरक्षेसाठी ‘आपत्ती व्यवस्थापन’ सज्ज!
By admin | Published: May 22, 2017 01:24 AM2017-05-22T01:24:32+5:302017-05-22T01:24:32+5:30
मान्सूनपूर्व तयारी अंतिम टप्प्यात : अतिवृष्टी, पूर परिस्थितीपासून बचावाकरिता सात सुरक्षा पथक तैनात
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकरच तथा अधिक प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ही बाब लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन विभाग कामाला लागला असून, मान्सूनपूर्व तयारी पूर्ण करीत अतिवृष्टी, पूर परिस्थितीने बाधित होऊ शकणाऱ्या जिल्ह्यातील १५२ गावांच्या सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बालासाहेब बोराडे यांनी सांगितले, की जिल्ह्यात सहा तालुक्यात सहा आणि जिल्हा पातळीवर एक, असे सात शोध व बचाव पथक तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय वाशिम येथील छत्रपती बहूद्देशीय तरुण मित्र मंडळ, या दोन सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज राहणार आहेत. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीदरम्यान बचाव कार्यासाठी दोन रबर बोटदेखील तैनात राहणार आहेत, अशी माहिती बोराडे यांनी दिली.
अधिक प्रमाणात पाऊस झाल्यास जिल्ह्यातील पेनबोरी, बाळखेड, चिचांबाभर (ता. रिसोड), उकळीपेन (ता. वाशिम) आणि बोरव्हा खुर्द (ता. मंगरूळपीर) ही पाच गावे बाधित होतात. त्यापैकी बोरव्हा खुर्द या गावाचा तीन बाजूने संपर्क तुटतो. त्यादृष्टीने सदर पाचही गावांमधील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व प्रकारच्या उपाययोजनांची तयारी पूर्ण झालेली आहे. दोन ते तीन दिवस सलग पाऊस सुरू राहिल्यास, अतिवृष्टी झाल्यास पेनटाकळी धरणाचे पाणी सोडण्यात आल्यास किंवा जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्या ‘ओव्हरफ्लो’ झाल्यास १५२ गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते, त्या दृष्टीनेही शोध व बचावकार्याची पूर्वतयारी पूर्ण झाली असून, गावागावातील नागरिकांना प्रत्यक्ष स्वत:च्या बचावासंबंधीचे प्रशिक्षण देण्यात आले आहेत, अशी माहिती बोराडे यांनी दिली.