४१ प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग;  नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 11:31 AM2020-08-19T11:31:44+5:302020-08-19T11:31:56+5:30

सांडव्यावरून पाणी वाहत असल्याने आधीच दुथडी भरून वाहत असलेल्या नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढण्याची भीती आहे.

Discharge of water from 41 project drains; Alert to riverside villages | ४१ प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग;  नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा  

४१ प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग;  नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा  

Next

लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात गेल्या १० दिवसांपासून पावसाचा धडाका सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पात काठोकाठ भरले आहेत. बहुतांश प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत असल्याने आधीच दुथडी भरून वाहत असलेल्या नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढण्याची भीती आहे. त्यात जिल्ह्यातील ४१ प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या क्षेत्रातील नदीकाठच्या गावांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात येत आहे.
जिल्ह्यात यंदा जुनच्या सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण चांगले आहे. त्यात जुलै महिन्याच्या मध्यंतरापासून पावसाचे प्रमाण वाढले. त्यामुळे जिल्ह्यात १६ आगस्टपर्यंतच ५५२. ५० मि.मी. पावसाची नोंद झाली. हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या ७३.७० टक्के आहे. वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७७५.७० मि.मी. पाऊस पडतो. गत दोन वर्षांत सप्टेंबर अखेरपर्यंतही पावसाने सरासरी गाठली नव्हती. गतवर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील परतीच्या आणि अवकाळी पावसामुळे जलस्त्रोतांना आधार मिळाल्याने पाणीटंचाईचे संकट टळले होते. यंदा जून महिन्यापासूनच पावसाचे प्रमाण चांगले आहे. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात यंदा १ जून ते १७ आॅगस्टरदम्यान अडीच महिन्यांच्या कालावधीत ६९० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या तुलनेत ८९ टक्के आहे. त्यामुळेच यंदा जिल्ह्यातील प्रकल्पांत ७० टक्के जलसाठा झाला आहे. त्यात गेल्या १० दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच असल्याने प्रकल्पांच्या पातळीत अधिक वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ४१ प्रकल्पांच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळेच प्रकल्पाच्या क्षेत्रात असलेल्या नदीकाठच्या गावांनी दक्षता बाळगण्याची गरज आहे. दरम्यान, जिल्ह्यातील मंगरुळपीर, मानोरा आणि मालेगाव तालुक्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक पाऊस पडत असल्याने तीन तालुक्यातील एकूण ३९ प्रकल्पांची पातळी शंभर टक्के झाली आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.


१८ प्रकल्पांची पातळी २५ टक्क्यांच्या खालीच
जिल्ह्यात गेल्या १० दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे सर्व प्रकल्पांची सरासरी पातळी ६९.६४ टक्के झाली आहे. त्यात ५२ प्रकल्प काठोकाठ भरले असले तरी, जिल्ह्यातील १८ प्रकल्पांची पातळी अद्यापही २५ टक्क्यांच्या खालीच आहे. त्यात १३ प्रकल्पातील उपयुक्त साठ्याची टक्केवारी शुन्य असून, ५ प्रकल्पांची पातळी ५ टक्के, तर उर्वरित १० प्रकल्पांची पातळी १० ते २५ टक्क्यांपर्यंत आहे.


५२ प्रकल्प ‘ओव्हर फ्लो
जिल्ह्यात तीन मध्यम आणि ११ बॅरेज आणि १२२ लघू प्रकल्प मिळून एकूण १३६ प्रकल्प आहेत. त्यातील वाशिम येथील एकबुर्जी आणि मालेगाव तालुक्यातील सोनल हे दोन मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत, तर कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्पातही ७८ टक्क्यांहून अधिक साठा झाला आहे. शिवाय वाशिम तालुक्यातील ७, मालेगाव तालुक्यातील १२, कारंजा तालुक्यातील २, मंगरुळपीर तालुक्यातील १०, रिसोड तालुक्यातील २ आणि मानोरा तालुक्यातील १७ प्रकल्प मिळून ५२ प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत.

Web Title: Discharge of water from 41 project drains; Alert to riverside villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.