उपाेषणाबाबत उपजिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:46 AM2021-07-14T04:46:52+5:302021-07-14T04:46:52+5:30
येथील मुख्य चैाकातील जि. प. विद्यालयासमोरील देशीदारूचे दुकान हटविण्यासह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश इंगळे यांनी ५ जुलैपासून ...
येथील मुख्य चैाकातील जि. प. विद्यालयासमोरील देशीदारूचे दुकान हटविण्यासह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश इंगळे यांनी ५ जुलैपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून हे उपोषण सुरू असून, अद्यापपर्यंत कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या उपोषणाची दखल घेतली नाही. त्यामुळे १२ जुलै रोजी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्याशी याविषयी चर्चा करून जिल्हा मध्यवर्ती बॅंक उपाध्यक्ष श्रीधर पाटील कानकिरड यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन उपोषणाची दखल घेण्याची पर्यायाने कामरगाव येथे देशीदारू दुकान हटविण्याची मागणी करण्यात आली आहे.
११ जुलैच्या भर पावसातदेखील प्रकाश इंगळे यांचे उपोषण सुरू असल्याने उपोषणकर्ते यांचे हाल झाले. कामरगाव येथील हे देशीदारूचे दुकान हटविण्यासाठी आतापर्यंत बचत गटाच्या महिलांनी व भुलोडा येथील तंटामुक्ती अध्यक्ष विनोद नंदागवळी यांनी सुद्धा आमरण उपोषणाचे शस्त्र उगारले होते. परंतु त्याचा सुद्धा काहीही फायदा न झाल्याने दुकान ‘जैसे थे’ आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश इंगळे यांनी विद्यार्थी यांचे हित लक्षात घेऊन हे दारूचे दुकान हटविण्यासाठी उपोषण सुरू केले असून, या उपोषणास कामरगावसह परिसरातील नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. परंतु प्रशासनाने इंगळे यांच्या उपोषणाची दखल न घेतल्याने नवव्या दिवशीही उपोषण सुरूच आहे.