मोठेगाव प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा होणार!
By admin | Published: March 15, 2017 02:52 AM2017-03-15T02:52:42+5:302017-03-15T02:52:42+5:30
एससी, एसटी आयोगाचे अध्यक्ष, सदस्यांची ग्वाही : मोठेगावच्या प्रकरणाची चौकशी.
वाशिम, दि. १४- महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष विजयकुमार कांबळे व सदस्य (विधी) सी. एल. थूल यांनी १४ मार्चला दलित विवाहिता मृत्यूप्रकरणी मोठेगाव (ता. रिसोड) येथे भेट दिली. यावेळी त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून मृत महिलेच्या कुटुंबियांशी चर्चा केली. तसेच आजूबाजूच्या इतर नागरिकांशीही चर्चा केली. या प्रकरणातील दोषीला कठोर शिक्षा होण्यासाठी आयोग प्रयत्न करेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, वाशिमचे उपविभागीय अधिकारी अनिल खंडागळे, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त माया केदार, उपविभागीय पोलीस अधिकारी जयकुमार चक्रे, तहसीलदार अमोल कुंभार आदींची उपस्थिती होती. मोठेगाव येथील दलित विवाहित मृत्यू प्रकरणाच्या तपासाची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष कांबळे व सदस्य न्यायमूर्ती थूल आज वाशिम जिल्हा दौर्यावर होते. यावेळी त्यांनी घटनास्थळाला भेट देऊन मृत महिलेचे आई-वडील व मुलांकडून सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर घटना घडलेल्या घराच्या आजूबाजूला राहणार्या नागरिकांशीही वार्तालाप केला. तत्पूर्वी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर व अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे यांच्याकडून सुरु असलेल्या तपासाची स्थिती जाणून घेतली. तसेच तपासामध्ये कोणतीही उणीव राहू नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.
मृत महिलेचे कुटुंबीय व परिसरातील नागरिकांनी पोलिसांना तपासात सहकार्य करावे. कोणालाही या प्रकरणाविषयी कोणत्याही प्रकारची माहिती असल्यास ती देण्याचे आवाहन कांबळे व न्यायमूर्ती थूल यांनी केले. या प्रकरणातील गुन्हेगाराला कठोर शिक्षा होण्यासाठी व केस कोर्टात उभी राहण्यासाठी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती- जमाती आयोग पोलीस प्रशासनाला योग्य मार्गदर्शन करेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच पोलिसांनी प्राप्त माहितीच्या आधारे सर्वांगीण बाजूने तपास करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.