वाशिम जिल्हयातील शंभरावर जि.प. शाळांचा वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 01:52 PM2019-08-30T13:52:40+5:302019-08-30T13:52:45+5:30
जिल्हयातील शंभरावर शाळांचा वीजपुरवठा खंडीत असल्याने ई-लर्निंग उपक्रमही प्रभावित झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषद शाळांच्या विद्युत देयकाचा भरणा कोणत्या निधीतून करावा, याबाबत अद्याप कुठलीही तरतूद नसल्याने मुख्याध्यापक अडचणीत सापडले आहेत. विद्युत देयकांचा भरणा थकीत असल्याने जिल्हयातील शंभरावर शाळांचा वीजपुरवठा खंडीत असल्याने ई-लर्निंग उपक्रमही प्रभावित झाला.
खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांमधील दर्जा उच्च प्रतीचा नसतो, अशी ओरड नेहमीच होते. याला जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळा अपवाद ठरत आहेत. पुरेशा प्रमाणात भौतिक सुविधा उपलब्ध नसतानाही, विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षक व मुख्याध्यापक नानाविध प्रयोग राबवित आहेत. समग्र शिक्षा अभियान तसेच अन्य योजनांतून जिल्हा परिषद शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतू, शासनस्तरावरून पुरेशा प्रमाणात निधी प्राप्त होत असल्याने प्रत्येक शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध होउ शकत नाहीत. जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यासाठी, ई-लर्निंग उपक्रम राबविण्यासाठी समग्र शिक्षा अभियान तसेच मुख्याध्यापक, शिक्षकांनी गावकऱ्यांमधून लोकवर्गणी केली. यामुळे जिल्ह्यात ७०० पेक्षा अधिक शाळांना डिजिटलची जोड मिळाली. परंतू, विद्युत देयकाचा भरणा करण्यासाठी निधीची तरतूद नसल्याने मुख्याध्यापक, शिक्षकांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक शाळांचे वीज देयक थकीत असल्याने ई-लर्निंग उपक्रमही प्रभावित झाला. दोन दिवसांपूर्वी वाशिम तालुक्यातील मोहगव्हान आणि अन्य एका जि.प. शाळेचे वीज देयक थकीत असल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे विद्यार्थांचे नुकसान होत आहे, विजेअभावी शाळेतील संगणक व टीव्ही बंद झाला आहे. विजेचे देयक कुणी भरावे याबाबत स्पष्टता नसल्याने मुख्याध्यापक अडचणीत आहेत.
विद्युत देयकाचा भरणा करण्यासंदर्भात सूचना
ग्राम पंचायतींला दरवर्षी १४ व्या वित्त आयोगातून लाखो रुपयांचा निधी शासनाकडून दिला जातो. या निधीमधून जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलभूत सुविधा उपलब्ध कराव्या, विद्युत देयकाचा भरणा करावा, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिल्या होत्या. या सुचनांची अंमलबजावणी काही ग्रामपंचायतींनी केली तर अनेक ग्राम पंचायती शाळांच्या विद्युत देयकाचा भरणा करण्याकडे सोयीस्कर बगल देत आहेत. बहुतांश शाळांचे विद्युत देयक भरण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकच पुढाकार घेत आहेत. विद्युत देयकासाठी निधीची तरतूद करावी, असा सूर शिक्षक, मुख्याध्यापकांमधून उमटत आहे.